तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात साडेतीनशे कुटुंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST2021-02-14T04:07:45+5:302021-02-14T04:07:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे ...

तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात साडेतीनशे कुटुंब !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेशपेठ येथील शंभर वर्षे जुन्या जीर्ण मॉडेल मिल चाळीतील साडेतीनशे कुटुंबांना जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे. ही जीर्ण इमारत केव्हा कोसळेल, याची शाश्वती नाही. पर्यायी घरकुल न मिळाल्याने या चाळधारकांना नाईलाजाने येथे राहावे लागत आहे. तीन दशकांपासून मृत्यूच्या सावटात ही कुटुंब जीवन जगत आहेत.
तीस वर्षांपूर्वी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली होती. मॉडेल मिलचे हस्तांतरण २ जुलै १९९९ रोजी करण्यात आले होते. त्यावेळी चाळीतील रहिवाशांना तीन महिन्यात पर्यायी घरे उपलब्ध करण्याचे आश्वासन तत्कालिन पालकमंत्र्यांनी दिले होते. परंतु, २० वर्षे झाली तरीही चाळधारकांना हक्काचे घर मिळालेले नाही.
मॉडेल मिल चाळ सुधार संघर्ष समितीने वेळोवेळी तत्कालिन मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी केली. परंतु, येथील कामगारांना घरे मिळालेली नाहीत. मॉडेल मिल बंद होऊन १५ वर्षे झाली तर ३० वर्षांपासून चाळधारक हक्काच्या घरांची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी आंदोलनेही केली, मात्र न्याय मिळालेला नाही.
...
करारानंतरही घरे मिळाली नाहीत
मॉडेल मिल चाळीची जागा राज्य शासनाने एन. टी. सी.ला लीजवर दिली होती. हा करार ७ डिसेंबर २०११पर्यंत होता. या जमिनीवर कामगारांना घरे बांधून देण्यासाठी ३.१६ एकर जागा आरक्षित ठेवण्यात आली होती. चाळीची जागा पी. पी. असोसिएट्स या बिल्डरला विकली आहे. यावेळी एन. टी. सी.आणि पी. पी. असोसिएट्स यांच्यात झालेल्या करारानुसार येथील कामगारांना विनामूल्य ३०० चौरस फुटाची घरे बांधून देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, घरे बांधून मिळालेली नाहीत.
....
दिलेली लिज रद्द करा
चाळीच्या जमिनीची लिज २०११मध्ये संपली. मात्र, नझुल अधिकाऱ्यांनी कामगारांना विश्वासात न घेता, ही जमीन पी. पी. असोसिएट्सला ३० वर्षांच्या लिजवर दिली. मात्र, केलेल्या करारानुसार कामगारांना घरे बांधून न दिल्यामुळे ही लिज रद्द करावी, अशी मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव डोंगरे यांनी केली आहे.
.....
३ महिन्याचे आश्वासन ३० वर्षानंतही अपूर्ण
मॉडेल मिळ चाळधारकांना ३ महिन्यात घरे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ३० वर्षे झाली तरी घरे मिळालेली नाहीत. २००४ मध्ये न्यायालयाने कामगारांना घरे देण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून चाळधारकांचा संघर्ष चालू आहे. परंतु अजूनही त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे.