‘सायको किलर’चा थरार
By Admin | Updated: February 18, 2015 02:39 IST2015-02-18T02:39:46+5:302015-02-18T02:39:46+5:30
उपराजधानीत लागोपाठ तीन दिवसात तीन अनोळखी युवकांचा तीक्ष्ण व धारदार शस्त्राने असंख्य घाव करून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका ‘सायको किलर’ ला अटक ...

‘सायको किलर’चा थरार
नागपूर : उपराजधानीत लागोपाठ तीन दिवसात तीन अनोळखी युवकांचा तीक्ष्ण व धारदार शस्त्राने असंख्य घाव करून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका ‘सायको किलर’ ला अटक करण्यात मंगळवारी कळमना पोलिसांना यश आले. तीन दिवसांपासून रेल्वे क्रॉसिंग आणि तलावाच्या काठावर झुडुपात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून येणाऱ्या मृतदेहांमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते. एखाद्या सायको किलरकडून लागोपाठ तीन खून होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
राकेश हरीहाडगे (२२), असे या सायको किलरचे नाव असून तो तुलसीनगर येथील रहिवासी आहे. तो वेडसर आहे. सोमवारच्या रात्रीच त्याला गस्तीवरील पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक मळकट पिशवी आढळली. पिशवीत रक्ताने माखलेले कपडे आणि रक्ताने माखलेला चाकू होता. पोलिसांनी त्याची कसून विचारपूस केली असता त्याने हे तिन्ही खून केल्याचे सांगितले.
घटना-१
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर रेल्वे लाईनच्या बाजूच्या नाल्यात अंदाजे ३० वर्षीय युवकाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर डोक्यापासून कंबरेपर्यंत आणि गुप्तांगावर धारदार व तीक्ष्ण शस्त्राच्या असंख्य जखमा आहेत. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचा वर्ण सावळा आणि सडपातळ बांधा आहे. दाढी बारीक, उंची अंदाजे ५ फूट ६ इंच आहे. उजव्या हातात स्टीलचे कडे आणि कंबरेत नाडा आहे.
घटना-२
सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नेहरूनगर रेल्वे क्रॉसिंगजवळ ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याचीही ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यापासून कंबरेपर्यंत तीक्ष्ण व धारदार शस्त्रांचे असंख्य घाव आहेत. त्याच्या अंगात काळ्या रंगाची जीन्स पँट, नारंगी रंगाचे गोल गळ्याचे टी शर्ट, काळ्या रंगाचे शर्ट आणि मळकट रंगाचे जर्किन आहे. तोही सावळ्या रंगाचा आणि सडपातळ बांध्याचा आहे. त्याची उंचीही ५ फूट ६ इंच आहे.
घटना-३
तिसरा मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराद्वारी तलाव बाभळीच्या झुडुपाजवळ आढळून आला. तोही अंदाजे ३०-३५ वयोगटातील आहे. मृतदेह विवस्त्र आहे. त्याच्या मानेवर, छातीवर, पोटावर, मांडीवर, पाठीवर आणि गुप्तांगावर धारदार व तीक्ष्ण शस्त्राच्या असंख्य जखमा आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार हा सायको किलर रात्री बेरात्री भटकायचा, रस्त्यावर जो कुणी आढळेल त्याच्यावर तुटून पडून चाकूने त्याच्या देहाची चाळण करायचा.