देणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी माझी झोळी
By Admin | Updated: April 5, 2017 02:09 IST2017-04-05T02:09:31+5:302017-04-05T02:09:31+5:30
आजचे जग खूप व्यवहारी झालेय...लोकांची मने दगडाची होताहेत...हृदयातील संवेदना तर गोठूनच पडल्यात...

देणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी माझी झोळी
सुनीलच्या मदतीला धावला समाज
दातृत्वाच्या भावनेने खोेटा ठरविला असंवेदनशीलतेचा आरोप
नागपूर : आजचे जग खूप व्यवहारी झालेय...लोकांची मने दगडाची होताहेत...हृदयातील संवेदना तर गोठूनच पडल्यात...अशी खंतवजा भावना सर्वत्र व्यक्त होत असतानाच अपघातात एक पाय गमावलेल्या गरीब तरुणाची अगतिकता आणि सरकारी उपेक्षेने त्याच्या कुटुंबीयांच्या हातात दिलेले भिकेचे ताट बघून अवघे समाजमन गहिवरले. हा तरुण व त्याच्या कुटुंबीय सोसत असलेली वेदना समाजाला हादरवून गेली आणि मी, माझे घर, माझे जिवलग या पलीकडेही एक नाते असते आणि ते नाते माणुसकीचे असते, याची नव्याने जाणीव होताच असंवेदनशीलतेचा आरोप झेलणाऱ्या याच समाजातून शेकडो मदतीचे हात त्या तरुणासाठी पुढे सरसावले आणि समाजाच्या या उदारतेचे दर्शन घडण्यासाठी निमित्त ठरले ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेले मंगळवारचे वृत्त.
पुढील पाच महिने आर्थिक मदत
महापालिकेचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी यांनी सकाळी ‘लोकमत’चे हे वृत्त वाचताच सहकारी नीरज दोतुलवार व मंगेश झाडे यांना लागलीच मेयो रुग्णालयात पाठविले. तिथे या दोघांनी सुनील सय्याम आणि त्याची आई निर्मलाबाई यांची भेट घेतली. विचारपूस करीत आर्थिक मदत केली. सुनीलला बँकेचे खाते उघडण्यास सांगून अकाऊंट क्रमांक सांगण्यासाठी स्वत:चा मोबाईल नंबर दिला. या खात्यात पुढील पाच महिने आर्थिक मदत पोहचविली जाईल, अशी ग्वाही दिली.
औषधांची मदत
सुनीलची जखम ओली असल्याने त्याला दर दोन दिवसांनी मलमपट्टी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु जिथे पोट भरायला पैसे नाही तिथे बँडेज विकत घेऊन मलमपट्टी कशी होणार होती. मात्र याची दखल मनसेच्या दक्षिण नागपूरचे सचिव तुषार गावंडे यांनी घेतली. तुषार यांनी सुनीलकडून त्याच्या औषधाची चिठ्ठी घेत औषधे तर आणून दिलीच सोबतच आर्थिक मदतही केली.
खासगी डॉक्टरही सरसावले
जिथे गेल्या तीन-चार दिवसांपासून मेयो व मेडिकल प्रशासन सुनीलवरील उपचाराची दखलही घेत नव्हते तिथे एका वृत्तामुळे खासगी डॉक्टर मदतीसाठी सरसावले. डॉ. अभय चौधरी व त्यांचे मित्र संजय दोनाडे यांनी सुनीलला घरी जाण्यापूर्वी आपल्या क्लिनीकमध्ये घेऊन गेले. तिथे उपचार केला. प्लॉस्टिक सर्जरीसाठी रुग्णालयातच थांबण्याचा आग्रह केला, परंतु घरी जाऊन परत पाच दिवसाने रुग्णालयात येतो अशी विनंती सुनीलने केल्यावर त्याला औषधे देत निरोप दिला.
कुणी केली पाण्याची सोय तर
कुणी आणला जेवणाचा डबा
गेल्या काही दिवसांपासून भीक मागून उपचार करणाऱ्या सुनील आणि त्याच्या आईच्या मदतीसाठी धावून आलेल्या लोकांमध्ये शिवपाल शर्मा, ईश्वर कोवेकर, प्रेमलाल धुर्वे व प्रभुलाल परतेकीही होते. यातील काहींनी आर्थिक मदत केली तर काहींनी आपल्या घरून जेवणाचा डबा आणला होता. यातील एक सदगृहस्थ इंदोरावरून सायकलने आले होते. त्यांनी सोबत पाण्याच्या थंड बॉटल्स आणल्या होत्या. त्या सुनीलच्या आईला देत, तुम्हाला भीक मागण्याची आता गरज नाही, उपचार होईपर्यंत माझ्या घरी रहा असा आग्रह धरला. त्यांच्या या शब्दामुळे सुनीलची आईच नाही तर त्यावेळी उपस्थित लोकही भावुक झाले.
पोलीस दादाही धावला
सक्करदरा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मोहन बोरजे हे वृत्त वाचताच धावून आले. मी यांना ओळखत नसलो तरी माझ्या शेजारच्या गावाचा उल्लेख वाचून त्यांच्या मदतीसाठी आलो, असे म्हणत बोरजे यांनी सुनीलच्या आईला, घाबरू नको, मी आहे असे म्हणून त्यांची आस्थेने चौकशी करायला लागले.
गावात हाताला काम नाही, म्हणून पोटासाठी भाकर शोधण्यासाठी शहरात येत असतानाच सुनील सय्याम नावाच्या युवकाला अपघात झाला. अचानक रेल्वेतून खाली पडल्याने मांडीपासून पाय कापला गेला. मेयो सरकारी रुग्णालय असले तरी उपचारात हातचे होते नव्हते ते सर्व खर्च झाले. कापलेल्या पायाची जखम भरण्यासाठी मेयोने मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागात पाठविले, परंतु येथे मिळाली ती तारीख. पुन्हा तो मेयोत आला. मात्र येथील डॉक्टरांनी हाकलून लावले. गेल्या चार दिवसांपासून सुनीलची आई निर्मलाबाई भीक मागून मुलावरील उपचार व त्याच्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करीत होती. ‘लोकमत’ने ‘मुलासाठी आई मागते भीक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला समाजमन धावून आले. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी, पोलीस व खासगी डॉक्टर सर्वच मदतीसाठी सरसावले. कोणी आर्थिक मदत केली, कोणी औषधे आणून दिली, कोणी जेवणाचा डबा, कोणी त्याला घरी पोहचविण्यासाठी कार आणली, कोणी मोफत उपचारासाठी आपले इस्पितळ खुले केले होते, तर काहींनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. तर काहीजण घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत, हे मायेचे बळ देण्यासाठी आले होते. प्रत्येकाची एकच तयारी होती ती म्हणजे त्या कुटुंबाला ‘माणुसकी’चा हात देण्याची.
कारने सोडले घरी
सन्मान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हर्षल गजेश्वर, आशिष दरेकर, मुकेश सदावर्ती, श्रीकांत आगरकर, राजेंद्र गजेश्वर, प्रशांत गायधने, प्रशात महल्ले यांनी सुनील आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या गावी काटोलला सोडण्यासाठी कार घेऊन आले होते. पहिल्यांदाच कारमध्ये बसल्यावर सुनीलला अचानक रडू कोसळले. त्याने, त्याच्या पत्नीने आणि आईने हात जोडून सर्वांचे आभार मानले.
यांनी दिली मदतीची ग्वाही
गेल्या पाच दिवसांपासून मेयोच्या परिसरात उघड्यावर दिवस-रात्र काढणाऱ्या सुनील आणि त्याच्या कुटुंबाला मदतीचा हात मिळाल्यानंतर मंगळवारी दुपारी ते आपल्या गावाकडे निघाले. यामुळे मदतीसाठी मेयोच्या परिसरात गेलेल्यांनी सुनील न दिसल्याने ‘लोकमत’ला दूरध्वनी करून त्याची माहिती घेतली. भविष्यात सुनीलला मदत लागल्यास आम्हाला सांगा असे म्हणून स्वत:चा मोबाईल नंबर दिला. यात रामदासपेठचे किशोर भोंगाडे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त आर.डी. आत्राम, मेडिकल चौकातील सेंटर पार्इंट हॉस्पिटल यांच्यासह अनेक लोक होते.
रेल्वेच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांची घेतली भेट
प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी वृत्त वाचून सकाळीच मेयो गाठले. बाह्यरुग्ण विभागाच्या समोर मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुनीलची भेट घेतली. त्याला आर्थिक मदत करीत आस्थेने विचारपूस केली. अपघात कसा झाला, रेल्वेचे तिकीट सोबत होते का, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी थेट रेल्वेचे कार्यालय गाठले. तिथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीतेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. सुनीलला रेल्वे विम्याची मदत मिळू शकेल का, यावर चर्चा केली. विशेष म्हणजे, गुप्ता यांनी सुनीलला मदत करण्याची तयारी दर्शवित यासारख्या अनेकांनाही मदत मिळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावरही विचार करण्याचे आश्वासन दिले.