हजारोंची औषधे कचऱ्यात
By Admin | Updated: December 7, 2015 06:21 IST2015-12-07T06:21:21+5:302015-12-07T06:21:21+5:30
कुणी हजारो रुपयांची औषधे (किटकनाशके) कचऱ्यात फेकून देतो, असे म्हटले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र कृषी

हजारोंची औषधे कचऱ्यात
जीवन रामावत ल्ल नागपूर
कुणी हजारो रुपयांची औषधे (किटकनाशके) कचऱ्यात फेकून देतो, असे म्हटले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र कृषी विभागाने हा प्रताप केला आहे. नागपूरपासून काहीच अंतरावरील पारशिवनी तालुक्यातील कृषी विभागाच्या ‘डुमरी फार्म’ वर पीक प्रात्यक्षिकांच्या नावाखाली खरेदी केलेली हजारो रुपयांची औषधे (किटकनाशके) व जैविक खते सर्रास कचऱ्यात फेकण्यात आली आहे.
कृषी विभागातर्फे दरवर्षी पीक प्रात्यक्षिकांच्या नावाखाली कोट्यवधीच्या निविष्ठांची (औषध, बियाणे व जैविक खते) खरेदी केली जाते. त्या सर्व निविष्ठा पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना वाटप करणे अपेक्षित असते. परंतु कृषी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी त्या निविष्ठा शेतकऱ्यांना वाटप न करता, अशाप्रकारे कचऱ्यात फेकून देत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ‘डुमरी फार्म’ वर फेकण्यात आलेल्या निविष्ठांमध्ये विदर्भ बायोटेक कंपनीचे ‘वंडर’ ( जैविक किटकनाशक, बॅच क्र. बी. ०४, किमत ४०० रुपये ), लक्ष्मी अॅग्रो केमिकल्सचे पेन्डीसम्राट ( पेन्डिमेथॅलीन - बॅच क्र. एलए ०६/२०१४, किमत २५५ रुपये प्रति ५०० मिलिलिटर, एक्सपायरी सप्टेंबर २०१६), गोविंद अॅग्रो टेक. लिमिटेडचे कृषीधन - फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ( बॅच क्र. पीएल १९०१, किमत ३३० रुपये प्रति ५०० मिलिलिटर, एक्सपायरी ११ डिसेंबर २०१५ ) आणि लाईट ट्रॅप या निविष्ठांचा समावेश आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने पुराव्यादाखल सर्व फेकलेली औषधे (किटकनाशके) व जैविक खतांचे फार्मवरील चौकीदारासमक्ष छायाचित्र काढून चित्रिकरण केले आहे.