‘त्या’ चार स्टेशन व्यवस्थापकांची होणार चौकशी
By Admin | Updated: September 10, 2015 03:42 IST2015-09-10T03:42:47+5:302015-09-10T03:42:47+5:30
बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान असलेल्या कृष्णा नदीत संपर्कक्रांती एक्स्प्रेसचा गार्ड पडून बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला होता.

‘त्या’ चार स्टेशन व्यवस्थापकांची होणार चौकशी
कर्तव्यात कसूर : संपर्कक्रांती एक्स्प्रेसची घटना भोवणार
नागपूर : बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान असलेल्या कृष्णा नदीत संपर्कक्रांती एक्स्प्रेसचा गार्ड पडून बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान त्यानंतर चार रेल्वेस्थानक ओलांडून ही गाडी आल्यानंतरही याबाबत एकाही स्टेशन व्यवस्थापकाने याबाबत नियंत्रण कक्षाला सूचना न दिल्यामुळे या स्टेशन व्यवस्थापकांची चौकशी करण्यात येणार आहे.
बुधवारी रात्री संपर्कक्रांती एक्स्प्रेसमधील गार्ड कृष्णा नदीवर गाडी उभी असताना चेन पुलींग दुरुस्त करण्यासाठी गाडीखाली उतरला होता. दरम्यान गाडी पुढे नेण्याची सूचना या गार्डने लोकोपायलटला दिल्यामुळे गाडी पुढे नेण्यात आली. यात गाडीत बसताना संबंधित गार्डचा पाय घसरून तो नदीत पडला होता. कृष्णा नदीवरून गाडी सुटल्यानंतर बुटीबोरी, गुमगाव, खापरी, अजनी असे चार रेल्वेस्थानक रस्त्यात लागतात. येथील स्टेशन व्यवस्थापकांनी लोकोपायलट आणि गार्डला हिरवी झेंडी दाखविल्याशिवाय गाडी पुढे जात नाही.
परंतु ही गाडी कुणीच अटेंड न केल्यामुळे गाडीत गार्ड आहे की नाही याची माहितीच अखेरपर्यंत मिळाली नाही.
नागपूरला ही गाडी आल्यानंतर या गाडीत चढणाऱ्या गार्डला गाडीत गार्ड नसल्याचे कळले आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान गार्डबाबत सूचना न देणाऱ्या या चारही स्टेशन व्यवस्थापकांची चौकशी होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
काय आहे यंत्रणा
कुठलीही गाडी एखाद्या रेल्वेस्थानकावरून जात असेल तर संबंधित स्थानकाच्या स्टेशन व्यवस्थापकास लोकोपायलट आणि गार्डला हिरवी झेंडी दाखवावी लागते. गाडीत गार्ड नसल्यास त्याची त्वरित रजिस्टरमध्ये नोंद करून नियंत्रण कक्षाला सूचना देणे क्रमप्राप्त ठरते. परंतु बुटीबोरी, गुमगाव, खापरी आणि अजनी येथील स्टेशन व्यवस्थापकांनी याबाबत काहीच न कळविल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आखून देण्यात आलेल्या नियमांचा हा भंग झाला आहे.