अंथरुणाला खिळून असणाऱ्यांना घरीच मिळेल लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:07 IST2021-07-27T04:07:36+5:302021-07-27T04:07:36+5:30
नागपूर : अंथरुणाला खिळलेल्या व घराबाहेर पडू शकत नसलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. ही लसीकरण मोहीम ...

अंथरुणाला खिळून असणाऱ्यांना घरीच मिळेल लस
नागपूर : अंथरुणाला खिळलेल्या व घराबाहेर पडू शकत नसलेल्या व्यक्तींना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. ही लसीकरण मोहीम लवकरच हाती घेतली जाणार आहे. या संदर्भातील कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. यातील लाभार्थी व्यक्तींची माहिती आशावर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गोळा केली जात आहे.
कोरोनाची लस घरोघरी जाऊन देण्यात यावी, अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती. या संदर्भात सरकारने जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घराबाहेर पडू शकत नाही, त्यांच्याकडून माहिती मागवून त्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात अशा नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे. पुढील महिन्यापासून यांचे लसीकरण होण्याची शक्यता आहे.
- यांचे होईल लसीकरण
अर्धांगवायू, कॅन्सर, किडनीविकार, यकृताचे विकार, हाडाचे विकार, अंथरुणाला खिळलेले रुग्ण, वृद्धत्वामुळे चालता-फिरता न येणार्या नागरिकांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे.
मला लस कधी मिळणार...
-शरीराच्या एका भागात अर्धांगवायू झाल्याने नीट चालता येत नाही. कुणाची तरी मदत घ्यावी लागते. केंद्रावर जाणे कठीण आहे. आता घरी लस मिळणार आहे, अशी वार्ता ऐकली आहे. लस कधी मिळते याची वाट पाहत आहे.
-राजाराम गायकवाड, हुडकेश्वर
-मला २५ वर्षांची मुलगी आहे. ती गतिमंद आहे. यामुळे तिला लसीकरण केंद्रावर घेऊन जाणेही कठीण आहे. घरीच कोणी लस देण्यासाठी आल्यास मोठी मदत होईल. सध्यातरी कोणी आले नाही किंवा नावाची नोंदही झाली नाही.
-आशा गोडबोले, टाकळी सीम
-घरी जाऊन लसीकरणाचे नियोजन सुरू
अंथरुणाला खिळून राहिलेल्या व्यक्तींना थेट घरी जाऊन लस देण्याबाबत शासनाकडून सूचना आल्या आहेत. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. लवकरच त्यांचे लसीकरण होईल.
-डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक
शहरात आतापर्यंत झालेले लसीकरण
-पहिला डोस : ८,८१,३१८
-दोन्ही डोस : ३,५६,८६३
६० पेक्षा जास्त वयोगट
-पहिला डोस : १,९५,४८९
-दोन्ही डोस : १,२२,७९८