त्या देयकांचे होणार फेर ‘आॅडिट’

By Admin | Updated: June 26, 2015 02:42 IST2015-06-26T02:42:13+5:302015-06-26T02:42:13+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागचे प्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी सादर केलेल्या देयकांचे बाहेरील संस्थेकडून परत ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे.

Those payments will be re-audited | त्या देयकांचे होणार फेर ‘आॅडिट’

त्या देयकांचे होणार फेर ‘आॅडिट’

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागचे प्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी सादर केलेल्या देयकांचे बाहेरील संस्थेकडून परत ‘आॅडिट’ करण्यात येणार आहे. जर अंतर्गत ‘आॅडिट’च्या अहवालाच्या तुलनेत यात तफावत आढळली तर डॉ.धवनकर यांच्याविरुद्ध चौकशी करण्यात येईल असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले आहे. शैक्षणिक सहलीच्या शुल्कात विभागप्रमुखांनी घोटाळा केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी लावला होता.
डॉ. धवनकर यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली होती. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची अफरातफर केली नसून सादर केलेली ही देयके योग्य असल्याचा अहवाल वित्त व लेखा विभागाने सादर केला होता. या आधारावर कुलगुरूंनी डॉ.धवनकर यांना ‘क्लीन चिट’ दिली होती.
कुलगुरूंनी ‘क्लीन चिट’ दिल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांमधील असंतोष कायम आहे. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व धवनकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यानंतर विद्यापीठात परत सूत्रे हलली व कुलगुरूंनी या देयकांचे बाहेरील संस्थेकडून ‘आॅडिट’ करण्याचा निर्णय घेतला. हे ‘आॅडिट’ विद्यापीठाचीच कामे पाहणाऱ्या एका संस्थेकडून करण्यात येणार आहे.
अंतर्गत अहवाल व बाहेरील संस्थेचा अहवाल यांच्यात थोडी जरी तफावत आढळली तर डॉ.धवनकर यांच्याविरुद्ध चौकशी करण्यात येईल असे कुलगुरूंनी सांगितले. या ‘आॅडिट’वर विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा प्रभाव पडायला नको अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Those payments will be re-audited