‘त्या' कर्मचाऱ्यांना वर्षभरानंतरही कामाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:50+5:302021-06-27T04:06:50+5:30
मनुष्यबळ कमी असल्यामुळे एसटी महामंडळाने २०१९-२० मध्ये भरती प्रक्रिया राबविली. त्यानुसार नागपूर विभागात २०१९-२० मध्ये ८३ चालक कम वाहक ...

‘त्या' कर्मचाऱ्यांना वर्षभरानंतरही कामाची प्रतीक्षाच
मनुष्यबळ कमी असल्यामुळे एसटी महामंडळाने २०१९-२० मध्ये भरती प्रक्रिया राबविली. त्यानुसार नागपूर विभागात २०१९-२० मध्ये ८३ चालक कम वाहक कामावर रुजू झाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. यानंतरही या कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये हजेरी वेतन मिळत होते. जून महिन्यात मुख्यालयाकडून या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती देण्याचा आदेश देण्यात आला. त्याची अंमलबजावणी नागपूर विभागानेही केली. सप्टेंबर महिन्यात या कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करून घेण्याचे परिपत्रक काढण्यात आले. पण, त्याची अंमलवजावणी मात्र करण्यात आली नाही. महामंडळाच्या नियमानुसार वर्षभरात किमान १८० दिवस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित केले जाते. पण, या कर्मचाऱ्यांची ड्युटीच लावली गेली नाही. त्यानंतरही नियमावर बोट ठेवून त्यांना नियमित करणे टाळले जात आहे. वेतनच थांबविले गेल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्वरित सेवेत सामावून वेतन देण्याची मागणी होत आहे.
..........
वाहतूक वाढताच रुजू करणार
‘नागपूर विभागात केवळ ६० टक्केच वाहतूक सुरू आहे. त्यासाठी नियमित कर्मचारी पुरेसे आहेत. वाहतूक वाढल्यास प्राधान्यक्रमाने या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू केले जाईल.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर