तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:17+5:302021-05-25T04:09:17+5:30
वैद्यकीय संघटनांशी पालकमंत्र्यांची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दुसऱ्या लाटेमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील व जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ...

तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी
वैद्यकीय संघटनांशी पालकमंत्र्यांची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुसऱ्या लाटेमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील व जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी केलेल्या सहकार्याची प्रशासनाने विशेष नोंद घेतली आहे. तिसऱ्या लाटेमध्येही आपल्या मदतीची प्रशासनाला अपेक्षा राहील, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची विविध विषयांवर बैठक झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय देवतळे, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे सचिव आलोक उंबरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय व्यवसायात असणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेत त्यांना आलेल्या समस्यांबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. पालकमंत्र्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी या काळात दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे प्रशासनातर्फे आभार मानले. तथापि, सध्या विविध खासगी हॉस्पिटल्सने कोरोनाकाळात दिलेल्या वैद्यकीय सेवेसंदर्भातील आकडेवारी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने सादर करण्याचे सांगितले. कोरोनाकाळातील उपचारासंदर्भात काही हॉस्पिटलबाबत तक्रारी असून, त्यासाठी सर्व हॉस्पिटलमधील रुग्णसेवेची निश्चित माहिती, सांख्यिकी महानगरपालिकेकडे असणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यातील धोरण ठरवताना प्रशासन व वैद्यक क्षेत्र यांना मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
बॉक्स
आदराचे स्थान असलेल्या वैद्यकीय क्षेत्राला गालबोट लागू नये
कोरोनाकाळामध्ये वैद्यकीय यंत्रणेचे महत्त्व ठळकपणे पुढे आले आहे. मात्र सोबतच या यंत्रणेची कार्यप्रणाली, पारदर्शकता व जबाबदारी याबाबतही सर्वसामान्यांमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठी ही महामारी सर्वच दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. अतिशय गुणवान, संवेदनशील व जबाबदार मुले आपल्या गुणवत्तेच्या आधारे या क्षेत्रात येतात. त्यामुळे समाज जेव्हा संकटात असतो त्यावेळी वैद्यकीय क्षेत्राकडून नेहमीच सकारात्मक मदत होत असल्याचे दिसून येते. मात्र अन्य सर्व क्षेत्राप्रमाणेच काही मूठभर बेजबाबदार लोकांमुळे आदराचे स्थान असलेल्या या क्षेत्राला गालबोट लागणार नाही याकडेही संघटनांनी जागरुकतेने लक्ष द्यावे, असा सल्लाही यावेळी पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.