मनसेच्या इंजिनला तिसरा डबा जुळेना
By Admin | Updated: November 15, 2016 02:34 IST2016-11-15T02:34:11+5:302016-11-15T02:34:11+5:30
महापालिकेच्या दोन निवडणुकीत मनसेचे रेल्वे इंजिन रिंगणात उतरले. मात्र, दोन्ही निवडणुकीत इंजिनला फक्त दोनच

मनसेच्या इंजिनला तिसरा डबा जुळेना
दहा वर्षांपासून दोनच नगरसेवक : राज ठाकरेंनी प्रचाराला यावे
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
महापालिकेच्या दोन निवडणुकीत मनसेचे रेल्वे इंजिन रिंगणात उतरले. मात्र, दोन्ही निवडणुकीत इंजिनला फक्त दोनच डबे जोडल्या गेले. तिसरी जागा मनसेला जिंकता आली नाही. यावेळी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे विस्ताराने मोठ्या असलेल्या प्रभागात तगडे उमेदवार रिंगणात उतरविले तरच मनसेची गाडी रुळावर येऊ शकते, अन्यथा मनसेची दमछाक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी नागपुरातील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता निवडणुकीच्या प्रचारासाठी यावे, सभा घ्यावा व बळ द्यावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
महापालिकेची २००७ ची निवडणूक मनसेसाठी तशी नवी होती. पक्षाचे शहरात फारसे संघटन नव्हते. बोलबालाही नव्हता. अशाही परिस्थितीत मामा धोटे व विकास खोब्रागडे हे दोन नगरसेवक विजयी झाले. त्यावेळी मनसे पुढील निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, २०१२ च्या निवडणुकीतही हे चित्र फारसे बदलले नाही.
मनसेने कुणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढविली. या निवडणुकीत नगरसेवक मामा धोटे यांचे तिकीट कटले. शेवटी प्रभाग १५ (ब) कळमनामधून विषया विकास खोब्रागडे या काट्याच्या लढतीत १३ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या मंगला गोतमारे यांना पराभूत केले. तर प्रभाग क्रमांक १८ (ब) नाईक तलावमधून श्रावण खापेकर यांनी एकतर्फी विजय नोंदविला होता. पुन्हा दोनच नगरसेवक महापालिकेत पोहचले. पाच वर्षांच्या प्रवासानंतर एकही जागा वाढली नाही. मोजक्याच जागेवर मनसेचे उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मनसेसाठी हा मोठा धक्का होता.
पुढे विधानसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार लढविले. मात्र, शहरात त्यांचा टिकाव लागला नाही. दखलपात्र मतेही मिळाली नाही. मतांची आकडेवारी मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारी आहे. मात्र, पक्षातील नव्या दमाचे कार्यकर्ते सातत्याने ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्नरत आहेत. जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने करून जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी मुंबईतून पाहिजे तशी मदत मिळत नाही, अशी खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे. महापालिकेच्या एकाही निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आले नाहीत. त्यांनी एकही सभा घेतली नाही.
मनसेचे निरीक्षक अधून मधून येतात. रविभवनात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतात. पण पुढे ठोस काहीच होत नाही, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये भावना आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरातील मनसेचे उमेदवार उपशहरप्रमुख प्रशांत पवार यांच्यासाठी राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली होती.
या सभेला अपेक्षित गर्दीही जमली होती. मात्र, निकाल पाहिजे तसा आला नाही. त्यामुळे या वेळी महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे येतील का, हा देखील मोठा प्रश्न आहे. एकूणच दहा वर्षानंतरही मनसेसमोरील आव्हाने कायम आहेत.
परीक्षा घेणाऱ्या मनसेचेच परीक्षेचे दिवस
४गेल्या निवडणुकीत सुशिक्षित व अभ्यासू व्यक्तीला उमेदवारी देता यावी म्हणून मनसेने परीक्षा घेतली होती. मुंबईहून विमानाने प्रश्नपत्रिका आल्या होत्या. परीक्षा न देणाऱ्याला उमेदवारी दिली जाणार नाही, असे आधीच जाहीर केले होते. याचे तंतोतंत पालनही करण्यात आले. तत्कालीन नगरसेवक मामा धोटे यांनी परीक्षा दिली नव्हती. पुढे त्यांचे तिकीट कटले होते. परीक्षेच्या या फॉर्म्युल्यामुळे बरेच सक्षम उमेदवार मनसेपासून दूरच राहिले. आता मनसेचेच परीक्षेचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे मनसे परीक्षेचा फॉर्म्युला बदलणार की नाही याकडेही लक्ष लागले आहे.