चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक
By Admin | Updated: August 2, 2015 03:00 IST2015-08-02T03:00:45+5:302015-08-02T03:00:45+5:30
पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला खापरखेडा-पारशिवनी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आरोपींनी दिली ३८ गुन्ह्यांची कबुली
नागपूर : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला खापरखेडा-पारशिवनी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांची चौकशी केली असता या टोळीने ठिकठिकाणी चोरी, दरोडा यासह इतर असे एकूण ३८ गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून १० हजार रुपये रोख, टाटा सुमोसह तलवार, लोखंडी सब्बल, रबरी हॅन्ड ग्लोव्हज, कानस, चाव्यांचा गुच्छा, टॉर्च आदी असा एकूण एक लाख ६० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विक्की देवीदास चंद्रिकापुरे, भागवत बबन बेंडे, नीतेश रामाजी गजभिये, भीम्या ऊर्फ भीमराव फुले सर्व रा. पिपळा (डाकबंगला) व बाबूलाल संजय ठाकूर रा. यवतमाळ अशी आंतरराज्यीय टोळीतील आरोपींची नावे आहेत. शासकीय वाहनाची चोरी करून दरोडा करण्याच्या प्रयत्नात आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांना २६ जुलै रोजी मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करून ते खापरखेडा-पारशिवनी मार्गावर पाठविले. दरम्यान भानेगाव (पारशिवनी फाटा) येथे मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास एमएच-३१/एसी-९८२४ क्रमांकाची टाटा सुमो रोडवर थांबली असल्याचे निदर्शनास आले. सुमोतील व्यक्तींची विचारपूस केली असता, सदर वाहन आंधळगाव येथील पाटबंधारे विभागाचे असून, वाहनातील चार जण याच विभागातील कर्मचारी असल्याचे चालकाने सांगितले. या सुमोतील एकास गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने ओळखले. तो पिपळा (डाकबंगला) येथील विक्की चंद्रिकापुरे असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच आरोपींनी तेथून वाहनासह पळ काढला. झडतीदरम्यान वाहनात कुकरी, चाकू, नटबोल्ट, रॉड, दोर, सब्बल, तलवार आदी साहित्य आढळले.