वन्यप्राण्यांसाठी ते करतात टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:19+5:302021-04-04T04:09:19+5:30
नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा ...

वन्यप्राण्यांसाठी ते करतात टँकरने पाणीपुरवठा
नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा वेळी पाण्याच्या शाेधात प्राण्यांची जंगलाबाहेर येऊन गावांमध्ये भटकंती सुरू असते. शिवाय एका जंगलातून दुसरीकडे भटकंती करताना वाटेत पाण्यासाठी त्यांची धडपड हाेते. प्राण्यांची ही धडपड लक्षात घेत ग्रामायणच्या निसर्गविज्ञान टीमतर्फे वन्यजिवांच्या भ्रमणमार्गातील पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्राण्यांची तृष्णा शमविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
ही व्यवस्था सांभाळणारे विजय घुगे यांनी या कार्याबद्दल माहिती दिली. निसर्ग विज्ञानच्या टीमने २०१५ पासून हे कार्य सुरू केले आहे. विशेषत: नुकतेच मुख्यमंत्र्यांनी संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा दिलेल्या मुनिया रिजर्व्ह फाॅरेस्टमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात ही व्यवस्था करण्यात येते. मुनिया हे वनक्षेत्र ९९५२ हेक्टर म्हणजे जवळपास १०० चाैरस किलाेमीटरमध्ये पसरले असून ताडाेबा, बाेर, उमरेड कर्हांडला व पेंच अभयारण्यादरम्यान भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. उन्हाळ्यात भटकंती करणारे प्राणी गावाकडे पाण्याच्या शाेधात येत असतात. मानव-वन्यजीव संघर्षाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेत मुनियाच्या वनक्षेत्रात वनविभाग व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. असलेल्या पाणवठ्यांची दुरुस्ती करण्यात आली. नंतर येथे टँकर लावून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यात काॅरिडाेरमधील गावांच्या नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे घुगे यांनी सांगितले.
यावर्षीही पाणीपुरवठ्याचे कार्य सुरू करण्यात येत असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले. सध्या काही पाणवठ्यात पाणी आहे तर अनेक सुकलेले आहेत. १५ एप्रिलनंतर येथील परिस्थिती भीषण हाेणार आहे. त्यानुसार पाणवठे स्वच्छ करण्याचे व बाेअरवेल दुरुस्तीचे काम वनविभाग व गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पाणीपुरवठ्याचे काम सुरू हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एका जंगलातून दुसरीकडे भ्रमण करताना वन्यप्राण्यांसाठी मुनिया वनक्षेत्रातून जाणारा एकमेव मार्ग आहे. या पाणवठ्यांचे पाणी केवळ वन्य प्राण्यांचीच तहान भागवते असे नाही तर गावातील पाळीव प्राणीही आपली तृष्णा भागवतात. येथील बाेअरवेलचे पाणी वाटसरूंनाही लाभदायक ठरणारे आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यातून या कार्याला गती मिळाली आहे.
- विजय घुगे, ग्रामायण निसर्ग विज्ञान संस्था