'ते' म्हणतात, येथे लघवी करू नका! तर मग करायची कुठे? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:43 AM2021-06-07T09:43:05+5:302021-06-07T09:44:18+5:30

Nagpur news वास्तविक वर्दळीच्या भागात १०० मीटर परिसरात मुतारी असणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील प्रमुख मार्गावर शोधूनही मुतारी सापडत नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना शहरासाठी हे भूषणावह नाही.

‘They’ say, don’t urinate here! So where to do it? | 'ते' म्हणतात, येथे लघवी करू नका! तर मग करायची कुठे? 

'ते' म्हणतात, येथे लघवी करू नका! तर मग करायची कुठे? 

Next
ठळक मुद्दे३३ हजार लोकसंख्येला एक मुतारी वर्दळीच्या भागात शोधूनही मुतारी सापडत नाही

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील मुतारींना ‘स्मार्ट लूक’ देण्यासाठी खूप गाजावाजा झाला. पण परिस्थितीत बदल झाला नाही. ३० लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात ९२ सार्वजनिक मुतारी आहेत. वर्दळीच्या वा बाजार भागात लघुशंका करावयाची झाल्यास शोधूनही मुतारी सापडत नाही. त्यामुळे नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला जागा मिळेल तिथे लघुशंका करतात. यामुळे त्रस्त असलेल्यांनी आपल्या घराच्या वा कार्यालयाच्या भिंतीवर येथे लघवी करू नका, असे ठळक अक्षरात लिहिलेले दिसते. परंतु मुतारीच नाही तर लघुशंका करायची कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात ९२ सार्वजनिक मुतारी आहेत. त्याही स्वच्छ राहत नाहीत. बांधकाम व्यवस्थित नाही. दुर्गंधीमुळे नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला लघुशंका करतात. वास्तविक वर्दळीच्या भागात १०० मीटर परिसरात मुतारी असणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील प्रमुख मार्गावर शोधूनही मुतारी सापडत नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना शहरासाठी हे भूषणावह नाही. महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक मुतारीला स्मार्ट लूक देण्याच्या वेळोवेळी घोषणा केल्या परंतु नवीन मुतारींचे बांधकाम कागदावरच आहे.

या मार्गावर शोधूनही मुतारी सापडत नाही

शहरातील वर्दळीचे वर्धा रोड, अमरावती रोड, नॉर्थ अंबाझरी रोड, काटोल रोड, सेंट्रल एव्हेन्यू रोड, कामठी रोड, भंडारा रोड अशा प्रमुख मार्गांवर शोधूनही सार्वजनिक मुतारी सापडत नाही. तसेच महाल, इतवारी, सदर, सीताबर्डी अशा गर्दीच्या बाजार भागातही मोजक्याच मुतारी आहेत. त्यांचीही स्वच्छता ठेवली जात नाही.

बाजारातील मुतारींची स्वच्छता नाही

शहरातील महाल व सक्करदरा बुधवार बाजार, नेताजी मार्केट, गोकुळपेठ मार्केट, मेहाडिया चौक, गांधीबाग, फुले मार्केट यासह काही ठिकाणी शौचालयाची व मुतारीची सुविधा आहे. परंतु काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे. यामुळे नागरिक लघुशंका करण्यासाठी जाण्याचे टाळून उघड्यावर जाणे पसंत करतात.

४० मुतारींचा प्रस्ताव प्रलंबित

आरोग्य विभागाने नवीन ४० मुतारींच्या बांधकामाचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे दोन वर्षापूर्वी पाठविला आहे. परंतु अजूनही हा प्रस्ताव प्रलंबित आहे. मनपाच्या २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद नाही. यावरून पदाधिकारी मनपा प्रशासनही मुतारीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.

लवकरच बांधकामाला सुरुवात

मुतारीसाठी शहराच्या विविध भागात जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. बांधकाम विभागाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची झोन स्तरावरून अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरातील सार्वजनिक ९२ मुतारी आहेत. यातील अनेक मुतारींचे बांधकाम जीर्ण झाले आहे. अशा मुतारींचे बांधकाम नवीन मॉडेलनुसार केले जाणार आहे. यामुळे लोकांना लघुशंकेला जाताना मुतारीचा शोध घ्यावा लागणार नाही.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन, मनपा

............

Web Title: ‘They’ say, don’t urinate here! So where to do it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.