रुग्णसेवेचे नियोजन व परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या बजावतात मोलाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:07 IST2021-05-12T04:07:36+5:302021-05-12T04:07:36+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या रुग्णांवर सलग १४ महिने मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचे जीवन कष्टमय ...

रुग्णसेवेचे नियोजन व परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या बजावतात मोलाची भूमिका
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या रुग्णांवर सलग १४ महिने मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचे जीवन कष्टमय आहे. पण, अशातही स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णाला आजारातून बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे. या परिचारिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवित, त्यांचा आत्मविश्वास ढळू न देता त्यांच्याकडून कोविड रुग्णांची सेवा करून घेणाऱ्या दोन व्यक्ती सतत २४ तास राबत आहेत. आपल्या समस्यांचा बाऊ न करता त्यातून मार्ग काढीत आहेत. पडद्यामागे राहून रुग्णसेवेत मोलाची भूमिका पार पाडत आहेत. या व्यक्ती आहेत, मेडिकलच्या परिचारिका अधीक्षिका (मेट्रन) वैशाली तायडे व मेयोच्या परिचारिका अधीक्षिका मालती डोंगरे. कोरोनाच्या लढ्यात त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरत आहे.
-एक टीम म्हणून कार्य करीत असल्याचा अभिमान
(वैशाली तायडे यांचा फोटो घ्यावा)
परिचारिकांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वत:च्या सुखदु:खाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रुग्णसेवा देत आहेत. रुग्णसेवा हे एक व्रत आहे आणि परिचारिका त्याला जागत असल्याचा मला अभिमान आहे, असे मत मेडिकलच्या मेट्रन वैशाली तायडे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या आत्मविश्वासाने मेडिकलच्या परिचारिका समोर गेल्या. परंतु जेव्हा परिचारिकांनाच कोरोनाची लागण होऊ लागली तेव्हा अडचणी वाढल्या. परंतु एक ‘चॅलेंज’ म्हणून त्याकडे पाहिले. ड्युटीवरील प्रत्येक परिचारिकेचे ‘कौंसलिंग’ केले. कोरोनाशी लढा देत रुग्णाला नवे आयुष्य देण्याचा त्यांच्यात आत्मविश्वास पेरला. पुढे दुसरी लाट आली. रुग्णांची संख्या दुपटीने वाढली, अडचणी वाढल्या, शारीरिक, मानिसक त्रास वाढला असताना रुग्णांची सुश्रुषा कुठेच कमी पडली नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही. परिचारिका डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा लावून रुग्णांवरील औषधोपचारासोबतच त्यांच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था पाहात आहेत. आई, बहीण, मैत्रिणीच्या रुपात रुग्णांशी संवाद साधत लवकर बरा होण्याचा विश्वास देत आहेत. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. कांचन वानखेडे यांच्या मार्गदर्शनात एक टीम म्हणून हे कार्य सुरू आहे. यामुळेच आम्ही यशस्वी होत आहोत. आमच्या यशाचे आणखी एक गमक आहे, आम्ही रुग्णाला ‘बेड नं’ म्हणून न पाहता तो त्याचा कुटुंबाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे, असे पाहतो. यामुळे त्याच्याशी एक जिव्हाळा निर्माण होतो. त्याचे प्रतिबिंब उपचारातही उमटत असल्याने याचा फायदा रुग्णाला होत आहे.
-जखमेवरच नाही तर मनावरही फुंकर घालतात
(मालती डोंगरे यांचा फोटो घ्यावा)
स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून कोरोनाबाधितांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी परिचारिका दिवस-रात्र एक करीत आहेत. ‘फ्लॉरेन्स नाईंटिगेल’ यांच्या कामाचा वारसा पुढे नेत आहेत, याचा मला अभिमान आहे. रुग्णाच्या केवळ जखमेवर मलमच लावत नाहीत, तर मनावरच्या घावावर फुंकरही घालतात. ‘नर्सिंग’ ही नोकरी नाही तर ती एक सेवा आहे, या शब्दात मेयोच्या मेट्रन मालती डोंगरे यांनी परिचारिकांच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, मेयोमध्ये खाटांच्या तुलनेत परिचारिकांची संख्या फार कमी आहे. रिक्त पदांची समस्याही आहेच. प्रत्येकीवर कामाचा ताण आहे. त्या स्थितीतही सलग १४ महिन्यांपासून कोरोनाबाधितांची सेवा अखंडित सुरू आहे. एक परिचारिका ३० ते ४० रुग्णांना सांभाळत आहे. पीपीई किट घालून प्रत्येक रुग्णाला औषधे देणे, त्याच्यापर्यंत जेवण पुरविणे, त्याच्या अडचणी सोडविणे, वेळप्रसंगी त्याची आई, बहीण होऊन त्याला जगण्याचा आत्मविश्वास देत आहे. कोरोनाच्या रुग्णसेवेत राहून परिचारिकांसोबतच त्यांचे कुटुंब पॉझिटिव्ह होत आहेत. अशावेळी त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवत त्यांना उपचारात मदत करणे, त्यांच्या सुटीचे नियोजन करणे आणि बरे झाल्यावर त्यांचे समुपदेशन करीत पुन्हा कोरोना रुग्णसेवेची जबाबदारी देणे, हे एक ‘चॅलेंज’ आहे. यात स्वत: परिचारिका मदत करीत असल्यानेच रुग्णसेवा अविरत सुरू आहे. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन शेंडे, डॉ. रवी चव्हाण, डॉ. सागर पांडे हे सदैव मदतीला असल्यामुळेच परिचारिकांनी रुग्णसेवेचा सुंदर आदर्शपाठ उभा केला आहे.