‘त्यांनी’ केली काेराेनाबाधितांच्या कुटुंबीयांची भाेजन व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:09+5:302021-05-25T04:09:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ‘डोळ्यातल्या पाण्याला तू वरदान दे, उपाशी राहू नये असं देवा अन्नदान दे’ साेशल मीडियावरील ...

‘त्यांनी’ केली काेराेनाबाधितांच्या कुटुंबीयांची भाेजन व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ‘डोळ्यातल्या पाण्याला तू वरदान दे, उपाशी राहू नये असं देवा अन्नदान दे’ साेशल मीडियावरील कवितेच्या या चार ओळी सध्या वास्तविकतेला स्पर्श करणाऱ्या आहेत. सर्व कुटुंबीयच कोरोनाबाधित झाल्यानंतर अनेकांचे हाल-बेहाल झालेत. अशा कठीण प्रसंगात काहींनी ‘दुरावा’ साधला तर अनेकांनी अनेकांची साथ दिली. कोरोनाबाधित (विलगीकरणात) असलेल्या आणि संकटात अडकलेल्या कुटुंबीयांना दोन वेळच्या भोजनाची घरपोच व्यवस्था जेसीआय उमरेड या संस्थेने करीत सेवाभाव जपला. २७ एप्रिलपासून त्यांनी या सेवेचा भार उचलला. आतापर्यंत या संस्थेच्या सदस्यांनी महिनाभरापासून २७ कुटुंबीयांना ही सेवा प्रदान केली.
कोरोना महामारीच्या विपरीत परिस्थितीत असंख्य संस्था-सामाजिक कार्यकर्त्यांचे सेवाव्रती हात पुढे आलेत. यामध्ये जेसीआय उमरेड या संस्थेनेसुद्धा खारीचा वाटा उचलत घरीच विलगीकरणात असलेल्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दोन वेळच्या भोजनाची घरपोच व्यवस्था केली. कोविड सेंटरमध्ये सेवारत परिचारिकांच्याही भोजनाची ऐनवेळी व्यवस्था करण्यासाठी ही संस्था धावली.
कोविड सेंटरमध्ये असंख्य रुग्ण गावखेड्यातील भरती होतात. लॉकडाऊनमुळे खाणावळी, भोजनालये, हॉटेल बंद आहेत. काही ठिकाणी पार्सलची सुविधा उपलब्ध आहे. असे असले तरी अनेकांना ते सुद्धा शक्य होत नाही. अशांनाही या संस्थेने अन्नदानाचे कार्य पार पाडले. संस्थेचे संस्थापक डॉ. शशिकांत जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे अध्यक्ष अतुल खांडेकर, प्रमोद चौधरी, अर्जुन गिरडे, प्रमोद रघुते, संजय ठाकरे, दिनेश पटेल, डॉ. विष्णुकांत मुंधडा, मनोज पंडित, आशिष वाढई यांनी सहकार्य केले. जेसीआयच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.