हे आहेत रिअल हिरो
By Admin | Updated: June 3, 2015 02:50 IST2015-06-03T02:50:46+5:302015-06-03T02:50:46+5:30
विश्वास ही या जगातली अत्यंत अमूल्य ठेव आहे. विश्वास विकत घेता येता नाही, तो परस्पर सामंजस्यावरच असतो.

हे आहेत रिअल हिरो
चांगुलपणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न : प्रामाणिक व्यक्तींचा लोकमततर्फे सत्कार
नागपूर : विश्वास ही या जगातली अत्यंत अमूल्य ठेव आहे. विश्वास विकत घेता येता नाही, तो परस्पर सामंजस्यावरच असतो. विश्वासावरच हे जग सुरळीत सुरूआहे. पण सध्याच्या काळात विश्वासघात आणि धोकेबाजीमुळे लोकांचा परस्परांवरचा विश्वास कमी झाला असला तरी काही लोकांमुळे माणुसकी आणि प्रामाणिकपणावरचा लोकांचा विश्वास कायम आहे. अनेक चांगली माणसे या समाजात आहेत. ज्यांनी थोड्याशा लाभासाठी स्वत:चे इमान विकले नाही. दागदागिने आणि रुपयांचा गल्ला पाहूनही त्यांचा प्रामाणिकपणा डगमगला नाही. प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपण्याचा वसा स्वीकारलेल्या काही अशाच रिअल हिरोंचा सत्कार लोकमततर्फे मंगळवारी करण्यात आला.हे रिअल हिरो रोज परिश्रमाने आपल्या परिवाराचे पालनपोषण करतात; पण विना मेहनतीने मिळालेला एक छदामही मिळविणे त्यांच्यासाठी पाप आहे.
प्रामाणिकपणाला सलाम
लोकमत कार्यालयात मंगळवारी सायंकाळी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आठ प्रामाणिक व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यात आॅटोचालक अल्ताफ अन्सारी, बाबा शेख, अलीम अन्सारी, इकबाल शेख, कुली अब्दुल मजीद, अंगद रामटेके, अजय पाल आणि अजहर पठाण यांचा समावेश होता. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे कार्यकारी संपादक एन. के. नायक आणि लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान यांनी या रिअल हिरोंचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र भेट देऊन सत्कार केला.
दागिन्यांनी भरलेली बॅग परत करणारे अब्दुल मजीद
३ एप्रिल रोजी रेल्वे स्टेशनच्या पूर्व द्वारावर प्रवाशांची प्रतीक्षा करताना कुली मजीद यांना बेवारस बॅग दिसली. यात दागिने, मोबाईल आणि चार हजार रुपये रोख होते. मजीद यांनी ती बॅग सांभाळून ठेवली आणि बॅगच्या मालकांची वाट पाहिली. बॅगेत असलेल्या मोबाईलवर कॉल आल्यावर त्यांनी मालकाला त्वरित बॅग घेण्यासाठी बोलाविले. ही बॅग हुडकेश्वर निवासी नीलेश मानघना यांची होती. नीलेश त्यांची पत्नी आणि मुलांसह एर्नाकुलम एक्स्प्रेसने नागपुरात आले. घाईघाईत बॅग ते स्टेशनवरच विसरले. त्यांना बॅग परत दिल्यावर त्यांनी पाहिले असता बॅगेत सर्व वस्तू सुखरूप होत्या.
अलीम अन्सारी यांनी चोरी गेलेली बॅग परत आणली
एक वर्षापूर्वी उत्तर प्रदेश येथून आलेल्या एक वृद्ध व्यक्तीची बॅग रेल्वे स्टेशनवरुन चोरीला गेली. त्या वृद्ध व्यक्तीने आॅटोचालक अलीम यांच्याशी संपर्क करून त्यांना चोराचे वर्णन ऐकविले. चोराचे वर्णन समजून घेतल्यावर हा चोर कोण असू शकतो, याचा अंदाज अलीम यांना आला. तो स्टेशनच्या पूर्व द्वारावरच काम करीत होता. त्याची चौकशी करीत अलीम चोराच्या कामठी येथील घरी पोहोचले. त्याच्याकडून बॅग घेऊन त्यांनी त्या वृद्धाला त्यांची बॅग परत आणून दिली. त्या बॅगमध्ये केवळ त्या वृद्ध गृहस्थाचे कपडेच होते. वृद्धाची एकूणच स्थिती पाहून अलीम यांनी त्याला कपडे आणि काही पैसेही दिले. याशिवाय उत्तरप्रदेशला त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीटही काढून दिले. अलीम यांनी अशी अनेक कामे केली आहे पण त्याची प्रसिद्धी करण्याची त्यांना गरज वाटत नाही. अल्लाह सारेच पाहतो आणि चांगल्या कर्माचे फळ अल्ला देईलच, हा त्यांचा विश्वास आहे.
अंगद - अजयने पोलिसांना दिली बॅग
रेल्वे स्टेशनच्या प्री-पेड आॅटो बूथजवळ बेवारस बॅग होती. ही बॅग कुली अंगद व अजय यांच्या सहकार्याने मूळ मालकाला परत मिळाली. या कुलींनी सापडलेली बॅग रेल्वे पोलिसांच्या हवाली केली. चंद्रपूर येथील निवासी प्रीती करोडे रेल्वेने चंद्रपूरवरून नागपुरात आल्या. त्यांच्या बॅगमध्ये महाग कपडे, दोन एटीएम, त्यांचा पासवर्ड असलेले पेपर्स आणि काही सामान होते. बॅग बेवारस असल्याने परिसरातील या कुलींनी त्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. जीआरपीचे जवान प्रवीण राठोड यांनी घटनास्थळी जाऊन बॅग पाहिली असता त्यात उपरोक्त सामान सापडले. ही बॅग एखाद्या असामाजिक तत्त्वाच्या हातात पडली असती तर एटीएममधून मोठी रक्कम काढता येणे शक्य होते.
अल्ताफने परत केले १० लाखांचे दागिने
२६ आॅगस्ट २०१३ रोजी राठीनगर येथील निवासी नाना कुकडे रेल्वेतून उतरून अस्ताप अन्सारी यांच्या आॅटोत बसले. पण आॅटोतून उतरताना ते बॅग आॅटोतच विसरले. बॅगेत लग्नासाठी खरेदी केलेले १० लाख रुपयांचे दागिने होते. खरबी रोड येथे त्यांना सोडल्यावर अल्ताफ त्यांच्या बॅगचा सांभाळ करीत त्यांची प्रतीक्षा करीत राहिले. तीन तासानंतर नाना कुकडे स्टेशनवर पोहोचले तेव्हा अल्ताफ यांनी त्यांना त्यांची बॅग परत केली. अल्ताफ यांनी मागील महिन्यात असामाजिक तत्त्वांच्या भीतीने सिकंदराबाद येथून नागपुरात आलेल्या एका अनाथ आणि आजारी बालकालाही मदत केली होती.
अजहर यांनी पकडून दिले चोरांना
गांधीबाग पोलिस क्वॉर्टर येथील निवासी आणि महात्मा गांधी हायस्कूलचे शिक्षक अझहर खान पठाण यांनी जीवावर खेळून दोन चोरांना रंगेहाथ पकडले. अजहर यांना पाचपावली पोस्ट आॅफिसजवळ एका वृद्धाकडून रुपये हिसकावून पळताना बाईकवर दोन युवक दिसले. बाईकवर असलेल्या अजहर यांनी त्यांचा पाठलाग केला. चोरांच्या वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले, पण अजहर यांनी नागरिकांच्या मदतीने चोरांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.
राहिलेली बॅग इक्बालने केली परत
ताजनगर, मानेवाडा निवासी शेख इक्बाल यांच्या आॅटोमध्ये एका वृद्ध महिलेची बॅग राहून गेली. त्या महिलेला आॅटोचा क्रमांक अथवा काहीही माहिती नव्हते. ती गणेशपेठ पोलीस स्टेशनला पोहोचली. चौकशीदरम्यान पोलिसांचा इक्बालशी संपर्क झाला. त्याने ती बॅग आॅटोतच ठेवली होती. बॅग घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इक्बालच्या प्रामाणिकपणामुळे त्या महिलेचे चार लाख रुपयांचे दागिने तिला दीड तासातच परत मिळाले. (प्रतिनिधी)