रेल्वेस्थानकावर प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:41+5:302021-03-14T04:08:41+5:30
नागपूर : नागपूरसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. नागपूर शहरात काही दिवसांपासून सरासरी २ हजार कोरोनाचे रुग्ण ...

रेल्वेस्थानकावर प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग
नागपूर : नागपूरसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. नागपूर शहरात काही दिवसांपासून सरासरी २ हजार कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून संशयित प्रवाशांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य शासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातील दुकाने, मॉलसह इतर प्रतिष्ठाणे आणि कार्यालये बंद राहणार आहेत. तर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांच्या मते, लॉकडाऊनच्या काळातही रेल्वेने जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. दरम्यान, एखाद्या प्रवाशाचे तापमान अधिक असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यास रेल्वेने प्रवास करण्यास मनाई करण्यात येणार आहे. तर नागपूर रेल्वेस्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांचीही रेल्वेस्थानकावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यातील प्रवासी संशयित वाटल्यास संबंधित प्रवाशाची राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या चमूतर्फे त्वरित रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यास होम आयसोलेशन किंवा इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये पाठविण्यात येईल. त्याच प्रमाणे दिल्ली, राजस्थान, केरळा, गुजरात आणि गोवा येथून रेल्वेगाडीने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे टेस्टचा रिपोर्ट नसल्यास कठोरपणे तपासणी करण्यात येईल. नागपूरमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेस्थानकावर ऑटो आणि बसची सुविधा पुरविण्याची सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनही रेल्वेगाड्या आणि रेल्वेस्थानक परिसरात सॅनिटायझेशनवर भर देत आहे. आरपीएफ जवान आणि टीटीई प्रवाशांना मास्क घालण्यासाठी जनजागृती करीत आहेत.
............