‘पारध’ प्रकरणी वाद चिघळला

By Admin | Updated: November 5, 2015 03:38 IST2015-11-05T03:38:23+5:302015-11-05T03:38:23+5:30

काटोल मतदारसंघातील भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे रोही व हरणाच्या शिकारीचे फेसबुकवर व्हायरल

There was a dispute in the case of 'Pardha' | ‘पारध’ प्रकरणी वाद चिघळला

‘पारध’ प्रकरणी वाद चिघळला

नागपूर : काटोल मतदारसंघातील भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे रोही व हरणाच्या शिकारीचे फेसबुकवर व्हायरल झालेल्या फोटोवरून वादळ उठले आहे. मात्र या प्रकरणात काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुढे येत आ. देशमुख यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर, बुधवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत देशमुख यांच्या अटकेची मागणी केली.
देशमुख यांनी केदारपूर काटोल येथील जंगलात तीन निलगायींना बंदुकीने गोळ्या झाडून ठार केले, असा आरोप करीत हा कृतीसाठी देशमुख यांना वन कायद्यांतर्गत अटक करावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी झिरो माईल येथील मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात आ. देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हरीण आणि निलगाय सोबतचे देशमुख यांचे फोटोही झळकविण्यात आले. शेळके यांनी कार्यकर्त्यांसह उप वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी शेळके म्हणाले, सुधारित वन कायद्यानुसार फक्त शेतकरीच आपल्या पिकाची नासाडी करणाऱ्या प्राण्यांची, वन विभागाची रितसर परवानगी घेऊनच शिराक करू शकतात. परंतु आमदार देशमुख यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून निलगायीची शिकार केली. शिकार केलेल्या परिसरात देशमुख यांचे स्वत:चे शेत नाही. ज्या बंदुकीने शिकार केली त्या बंदुकीचा परवाना देखील देशमुख यांच्या नावावर नाही. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून आ. आशिष देशमुख यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी उपवनसंरक्षक यांना दिले.
देशमुख केवळ सोबत होते
शिवसेना जिल्हाप्रमुख व नरखेड पंचायत समितीचे सभापती राजेंद्र हरणे व काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत आ. देशमुखांना पाठिंबा दर्शविला आहे. काटोल व नरखेड भागातील वनक्षेत्राजवळ असलेल्या शेतकऱ्यांना रोही व रानडुकरांपासून खूपच त्रास सहन करावा लागतो. ही जंगली श्वापदे कापणीला आलेले उभे पीक नष्ट करतात. २२ जुलै २०१५ रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढून शेतीचे नुकसान करणाऱ्या रोही व रानडुकरांची शिकार करण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली. या परिपत्रकाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आ. देशमुख यांनी केल्याचा दावा, हरणे यांनी केला. काटोल तालुक्यातील लाडगावच्या अशोक रिधोरकर यांच्या शेतातील ही घटना असून यामध्ये वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरीही सहभागी असल्याचे हरणे यांनी सांगितले. देशमुख यांनी शिकार केली नसून ते केवळ सोबत असल्याचा दावा संदीप सरोदे यांनी केला. काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे फोटो फेसबुकवर टाकल्यानेच हा गोंधळ उडाल्याचेही ते म्हणाले. ३० आॅक्टोबर व ५ नोव्हेंबरदरम्यान वनविभागाकडून परवानगी घेऊन काटोल भागात दोन व नरखेड परिसरात तीन रोही मारल्याचा खुलासा सरोदे यांनी यावेळी केला. ही शिकार शासन निर्णयाच्या अनुषंगाने, कायदा, नियम व अटींचे पालन करून झाली असून यात देशमुखांचा संबंध नसल्याचे सरोदे म्हणाले. पत्रपरिषदेला काटोल पं.स.चे उपाध्यक्ष योगेश चाफले, मायाताई दुरुगकर, दिलीप ठाकरे व अनेक शेतकरी हजर होते. (प्रतिनिधी)

Web Title: There was a dispute in the case of 'Pardha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.