परिवर्तनासाठी दबावगट असावा
By Admin | Updated: October 10, 2014 01:00 IST2014-10-10T01:00:24+5:302014-10-10T01:00:24+5:30
हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या

परिवर्तनासाठी दबावगट असावा
भारत पाटणकर : राज मेहर यांच्या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नागपूर : हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या क्षेत्रात कवींना अपेक्षित परिवर्तन करायचे असेल तर अशा समविचारी कवींचा एक दबावगट तयार केला पाहिजे, असे मत बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.
निर्मिती विचार मंच, कोल्हापूरतर्फे नागपुरातील राज मेहर यांच्या ‘ओळीनंतरच्या ओळी’ आणि ‘तुझी कविता तुझ्याचसाठी’ या दोन काव्यसंग्रहाच्या द्वितीयावृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सावित्रीबार्इंच्या जीवनकार्याच्या अभ्यासक अमेरिकेतील लेखिका डॉ. गेल अॅम्वेट यांच्या हस्ते या दोन्ही आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. गेल यांनी यावेळी छोटेखानी भाषणातून राज मेहर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कवितांचे अर्थ समजून घेत त्यांनी या कविता अतिशय प्रगल्भ असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी एका काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात अनेक कवींनी कविता सादर केल्या. संचालन प्रसिद्ध कवी किरण भिंगारदिवे यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ पुस्तकनिर्मितीच्या क्षेत्रातील अनिल म्हमाने यांच्या बीजभाषणाने झाली. डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या काव्यवाचन व धन्यवाद प्रस्तावाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)