बाजारात उठाव नसल्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST2021-02-08T04:07:46+5:302021-02-08T04:07:46+5:30

- गरीब, सामान्यांना फायदा : किरकोळ व्यापाऱ्यांचा भाव कमी करण्यास नकार मोरेश्वर मानापुरे नागपूर : अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून ...

Since there is no upswing in the market | बाजारात उठाव नसल्याने

बाजारात उठाव नसल्याने

- गरीब, सामान्यांना फायदा : किरकोळ व्यापाऱ्यांचा भाव कमी करण्यास नकार

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : अर्जेंटिना आणि ब्राझील देशातून सोयाबीन कच्च्या तेलाची सुरू झालेली आयात आणि विदेशात मंदीचे वातावरण असल्याने देशांतर्गत स्थानिक खाद्यतेल बाजारात सर्वाधिक ८० टक्के विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलाचे दर प्रति किलो जवळपास ११ रुपयांनी उतरले आहे. दर कमी झाल्यानंतरही पूर्वी साठा करून ठेवलेल्या ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी दर कमी करण्यास नकार दिला आहे. नवीन मालाचा साठा असलेले किरकोळ व्यापारी प्रति किलो १२२ ते १२४ रुपये दराने विक्री करीत आहेत. खाद्यतेलाला उठाव कमी असल्याने भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

दरवाढ व साठेबाजांकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा

दिवाळीत सोयाबीन व पाम खाद्यतेल १०० रुपये आणि सूर्यफूल तेल १२० रुपये किलो होते. पण मोठ्या साठेबाजांनी अनेक कारणे सांगून सणाच्या तोंडावर अतोनात भाव वाढविले होते. पंधरा दिवसापूर्वी सोयाबीन तेलाचे दर १३५ रुपयावर पोहोचले होते. या तेलाच्या दरवाढीचा उच्चांक होता. त्यानंतर सामान्यांमध्ये दरवाढीची ओरड सुरू झाली. साठेबाजांवर धाडी मारण्याची आणि भाव दररोज का वाढतात, याची चौकशी करण्याची मागणी ग्राहक संघटनांनी केली होती. पण याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला. त्यामुळे गरीब आणि सामान्यांना महागाईचा सामना करावा लागला होता.

उठाव कमी झाल्यानेच भाव उतरले

आयात वाढल्याने सोयाबीन खाद्यतेलाचे दर उतरल्याचे वक्तव्य व्यापारी संघटना करीत असल्या तरीही स्थानिक बाजारात खाद्यतेलाला उठाव नसल्याने आणि बाजारात मंदी आल्याने खाद्यतेलाचे दर उतरल्याचे कारण काही व्यापाऱ्यांनी दिले. मोठ्या व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेलाचा साठा आहे. गुजरात आणि अन्य राज्यातून नागपुरात पॅकिंगसाठी सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात येते. उठाव नसल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा होत आहे. थोडा फार तोटा सहन करून मोठ्या व्यापाऱ्यांनी तेल विक्रीसाठी बाजारात आणल्याने भाव कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढे आणखी १० रुपयापर्यंत भाव कमी होऊ शकतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. मोठ्या खाद्यतेल कंपन्या लिटरमागे (एक लिटर ९१० ग्रॅम) जास्त नफा कमावून पूर्वीच्या वाढीव भावातच विक्री करीत आहेत. त्याचा फटका सामान्यांना बसत आहे.

नागपूर बाजारपेठ विदर्भात सर्वात मोठी

खाद्यतेलासाठी नागपूर बाजारपेठ विदर्भात सर्वात मोठी समजली जाते. नागपुरातून संपूर्ण जिल्ह्यात दररोज जवळपास १५ हजार टिन (एक टिन १५ किलो) खाद्यतेलाची विक्री होते. यामध्ये सोयाबीन खाद्यतेलाचा सर्वाधिक ८० टक्के वाटा आहे. त्याखालोखाल सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाची विक्री होते. त्यामुळे सणासुदीत साठेबाजांनी संगनमत करून सोयाबीनचे सर्वाधिक १३५ रुपयापर्यंत दर वाढविले. पण आता विक्री कमी होऊ लागल्याने भावात घसरण सुरू झाली आहे.

पाम तेलाचेही भाव उतरले

सोयाबीनसह पाम खाद्यतेलाचे भावही उतरले आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया येथून पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात पाम तेलाचे दर प्रति किलो १० रुपयाने उतरून १२० रुपयावर पोहोचले आहे. या तेलाची सर्वाधिक विक्री हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तसेच गृहउद्योगात होते.

खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)

खाद्यतेल २१ जाने. ७ फेब्रु.

सोयाबीन १३५ रु. १२४ रु.

पाम १३० रु. १२० रु.

सूर्यफूल १४० रु. १३५ रु.

शेंगदाणा १६० रु. १५६ रु.

मोहरी १४० रु. १३५ रु.

जवस १३० रु. १३० रु.

तीळ १५० रु. १४५ रु.

खोबरेल २४० रु. २४० रु.

Web Title: Since there is no upswing in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.