ओबीसींच्या शिष्यवृत्तीत कपात नाही
By Admin | Updated: December 16, 2015 03:00 IST2015-12-16T03:00:38+5:302015-12-16T03:00:38+5:30
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपये केली जाईल.

ओबीसींच्या शिष्यवृत्तीत कपात नाही
सामाजिक न्यायमंत्र्यांची हमी : उत्पन्न मर्यादा सहा लाख करणार
नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाख रुपये केली जाईल. यासंबंधीचा प्रस्ताव महिनाभरात मंजूर केला जाईल, अशी घोषणा करीत ओबीसींच्या शिष्यवृत्तीत कपात केली जाणार नाही, अशी हमी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कपात करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने शिक्षण शुल्क निश्चितीसाठी समिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून किती टक्के गुण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरवायचे, शिक्षण शुल्काच्या प्रमाणात किती शिष्यवृत्ती द्यायची, आदी अटी लादण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.
एका वक्तव्यामुळे बिहारमध्ये काय झाले, माहिती आहे ना, असा चिमटा काढत ओबींसीच्या शिष्यवृत्तीत कपात केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला. जयदत्त क्षीरसागर यांनी ओबीसी शिष्यवृत्तीचे ८७० कोटी रुपये सरकारकडे शिल्लक असल्याचे सांगितले.
सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी क्षीरसागर यांचा आरोप फेटाळून लावला; सोबतच ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कपात न करण्याची हमी दिली. (प्रतिनिधी)