कुलसचिवांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा रेकॉर्ड नाही

By Admin | Updated: August 10, 2016 02:38 IST2016-08-10T02:38:54+5:302016-08-10T02:38:54+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम यांच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मूल्यांकनासंदर्भातील

There is no record of the re-evaluation of the answer sheets of the documents | कुलसचिवांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा रेकॉर्ड नाही

कुलसचिवांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा रेकॉर्ड नाही

विद्यापीठाची हायकोर्टात माहिती : ११ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम यांच्या उत्तरपत्रिकांच्या पूनर्मूल्यांकनासंदर्भातील आर-१ व आर-२ हा महत्त्वाचा रेकॉर्ड विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याची माहिती मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.
मेश्राम यांनी नागपूर विद्यापीठातून बी. कॉम. (१९८२), बी. ए. अ‍ॅडिशनल (१९८२), बी.जे. (१९८४), एम.एम.सी.जे. (१९८७) व एम. कॉम. (१९९५) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रा. सुनील मिश्रा यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मेश्राम यांच्याशी संबंधित आर-१ व आर-२ या रेकॉर्डची माहिती मागितली होती.
जन माहिती अधिकाऱ्याने माहिती देण्यास नकार दिला. प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने हा निर्णय कायम ठेवला. परिणामी मिश्रा यांनी राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठात द्वितीय अपील दाखल केले होते. हे अपील मंजूर करण्यात आले. या आदेशाविरुद्ध विद्यापीठाने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने माहिती आयोगाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिली आहे.
या प्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, विद्यापीठाने प्रतिज्ञापत्र सादर करून वरीलप्रमाणे माहिती दिली.
न्यायालयाने ही बाब लक्षात घेता पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी ११ आॅगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली. विद्यापीठातर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी तर, मिश्रा यांनी स्वत:च बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: There is no record of the re-evaluation of the answer sheets of the documents