५ व ६ सप्टेंबर रोजी नागपुरात जनता कर्फ्यू नाही, पण स्वयंस्फूर्तीने घरातच राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 22:27 IST2020-09-04T22:27:26+5:302020-09-04T22:27:50+5:30
महापालिकेद्वारे ‘जनता कर्फ्यू’संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता बाजारांमध्ये गर्दी करू नये. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी शनिवार व रविवारी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

५ व ६ सप्टेंबर रोजी नागपुरात जनता कर्फ्यू नाही, पण स्वयंस्फूर्तीने घरातच राहा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवार ५ सप्टेंबर आणि रविवार ६ सप्टेंबर असे दोन दिवस नागपूर शहरात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची मागणी जनप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. सोशल मीडियावरही ‘जनता कर्फ्यू’ लागू होत असल्याचे संदेश व्हायरल होत आहेत. परंतु महापालिकेद्वारे ‘जनता कर्फ्यू’संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता बाजारांमध्ये गर्दी करू नये. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी शनिवार व रविवारी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
नागपूर शहरात कोरोना पॉझिटिव्हच्या संख्येत वाढच होत आहे. सुरूवातीलाच ‘आयसीएमआर’ आणि इतर सरकारी एजन्सींनी सप्टेंबर महिन्यात कोविडचा धोका वाढण्याचा इशारा दिला होता. मनपातर्फे चाचणी केंद्र्रही वाढविण्यात आले आहेत. शासनाच्या दिशानिर्देशांच्या पालनासंदर्भात आता मनपाने अधिक कठोरतेने कारवाई सुरू केली आहे. आजपासून मनपाच्या उपद्रव शोध पथकाने मास्क न लावणाऱ्यांविरोधातील कारवाईला गती दिली आहे, असेही महापौरांनी सांगितले.