हातात हात घालून लढण्याची गरज
By Admin | Updated: February 12, 2017 02:24 IST2017-02-12T02:24:04+5:302017-02-12T02:24:04+5:30
आज झेंडा कुणाच्या हाती आहे. कोण पुढे आहे, आणि कोण मागे. या सर्व गोष्टी विसरून प्रत्येकाने एकदुसऱ्याच्या हातात हात घालून एकजूट

हातात हात घालून लढण्याची गरज
भारतीय महिला फेडरेशनची सभा : स्मिता पानसरे यांचे प्रतिपादन
नागपूर : आज झेंडा कुणाच्या हाती आहे. कोण पुढे आहे, आणि कोण मागे. या सर्व गोष्टी विसरून प्रत्येकाने एकदुसऱ्याच्या हातात हात घालून एकजूट होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा स्मिता पानसरे यांनी केले.
भारतीय महिला फेडरेशनच्यावतीने ‘आजच्या परिस्थितीमध्ये स्त्री शक्तीच्या आंदोलनाची दशा व दिशा’ या विषयावर शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. आमदार निवासाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय महिला फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिव अॅनी राजा, राज्य सचिव लता भिसे, नूरजी व गार्गी चक्रवर्ती उपस्थित होत्या. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भारतीय महिला फेडरेशन या संघटनेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा सत्कार करण्यात आला.
पानसरे पुढे म्हणाल्या, सध्या विरोधक उघडपणे वार करू लागले आहे. त्यामुळे आम्हाला सावध झाले पाहिजे. आम्हाला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी लढाई सुरू आहे. मात्र सोबतच समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हेही ओळखण्याची गरज आहे. समाजात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील इतिहास आणि अभ्यासक्रम बदलविला जात आहे. केंद्र सरकार एखाद्या गारुड्याप्रमाणे नवनवीन खेळ करीत आहे. अशा लोकांना पुरोगामी विचारांची भीती वाटत होती, म्हणून पुरोगामी विचारांच्या लोकांचे जाणीवपूर्वक खून केले असाही त्यांनी आरोप केला.
संघटनेच्या राष्ट्रीय सचिव अॅनी राजा यांनी अशा कार्यक्रमातून भविष्यासाठी ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले. तसेच गार्गी चक्रवर्ती यांनी मार्गदर्शन करताना आज आम्ही आमच्या संविधानाचे रक्षण करीत आहे, की नाही, अशी मनात भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उषा मिश्रा यांनी केले तर रंजना महाजन-काळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)