लग्नपत्रिका असूनही बँकेत पैसे मिळेना
By Admin | Updated: February 2, 2017 02:12 IST2017-02-02T02:12:07+5:302017-02-02T02:12:07+5:30
शासनाच्या नोटाबंदी निर्णयाचा फटका अद्यापही कायम आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही आर्थिक घडी विस्कटली

लग्नपत्रिका असूनही बँकेत पैसे मिळेना
नोटाबंदीचा फटका कायम : सांगा, लग्न उरकायचे कसे?
देवलापार : शासनाच्या नोटाबंदी निर्णयाचा फटका अद्यापही कायम आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही आर्थिक घडी विस्कटली असल्याने एका महिलेवर मुलीच्या लग्नाचे संकट ओढवले आहे. ‘आपलेच पैसे आणि आपणच चोर’ अशा बिकट स्थितीत केवळ २४ हजारांत लग्नसोहळा उरकायचा कसा असा प्रश्न त्या महिलेचा आहे.
देवलापार येथील निवासी मालती सहादेव राठोड यांच्या मुलीचे लग्न ५ फेब्रुवारीला आहे. त्यांनी लग्नासाठी काही रक्कम स्टेट बँकेच्या रामटेक शाखेत जमा केली होती. तसेच भविष्य निर्वाह निधीतून १ लाख ९० हजार रुपयांची उचल केली. वन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या या महिलेच्या बँक खात्यात १ लाख ९० हजारांची रक्कम जमा झाली. परंतु बँकेतून पैसेच मिळत नसल्याने त्यांची मोठी परवड होत आहे. सदर महिला मंगळवारी रामटेकच्या स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी गेली असता, त्यांना केवळ २४ हजार रूपये देण्यात आले. त्यांनी मुलीच्या लग्नाची माहिती दिली. सोबत लग्नपत्रिकाही जोडली. परंतु बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. उलट डेकोरेशन व सर्वांना धनादेश द्या, असे बँकेकडून बजावून सांगण्यात आले. वारंवार विनवणी करून शाखा व्यवस्थापक काहीही ऐकण्यास तयार नसल्याने ती महिला हताश झाली आहे.
लग्नसमारंभ असणाऱ्यांना अडीच लाखांपर्यंत रकमेची उचल करता येईल, असा नियम असताना ग्रामीण भागात चित्र वेगळेच आहे. नोटाबंदी निर्णयाच्या नियोजनशून्यतेचा फटका अद्यापही सहन करावा लागत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)