महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा न्यायाधीश निपजला नाही : सुरेश द्वादशीवार यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 08:47 PM2019-09-14T20:47:54+5:302019-09-14T20:50:55+5:30

महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा एकही न्यायाधीश आजवर निपजला नसल्याची व्यथा लोकमतचे मुख्य संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे व्यक्त केली.

There is no judge in Maharashtra who gives justice to Gandhi: Suresh Dwadashiwar regretted | महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा न्यायाधीश निपजला नाही : सुरेश द्वादशीवार यांची व्यथा

महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा न्यायाधीश निपजला नाही : सुरेश द्वादशीवार यांची व्यथा

Next
ठळक मुद्दे‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ द्विदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी विचारकांनी जेवढा अन्याय महात्मा गांधींवर केला, तेवढा अन्याय इतर कुठेही झालेला नाही. मार्क्सवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद, आंबेडकरवाद आणि खुद्द गांधीवाद्यांच्या अवडंबरात अडकलेल्या गांधीविचारांना न्याय देण्याची किमया महाराष्ट्रातील लेखकांना साधता आली नाही. खरं सांगायचे तर महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा एकही न्यायाधीश आजवर निपजला नसल्याची व्यथा लोकमतचे मुख्य संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे व्यक्त केली.
साहित्य अकादमी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभाग व गांधी विचारधारा विभागाच्यावतीने शंकरनगर येथील गांधीभवन येथे आयोजित ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या विषयावरील द्विदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्यात बीजभाषण करताना द्वादशीवार यांनी वैचारिक विभागणी असलेल्या महाराष्ट्रातील लेखकांची महात्मा गांधी यांच्याबाबतीतल्या भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी साहित्य अकादमी मुंबईचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, मराठी सल्लागार मंडळाचे संयोजक रंगनाथ पठारे, प्रसिद्ध संशोधक डॉ. अभय बंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, गांधी विचारधारा विभागप्रमुख प्रमोद वाटकर, डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्यावर जगभरात एक लाखाहून अधिक पुस्तके लिहिल्या गेली आहेत. जगपातळीवरील सर्वच क्षेत्रात महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. सबंध गुजरातेतील साहित्यावर गांधींचा प्रभाव दिसून येतो. मात्र, गांधींना ओळखण्याचे जे सामर्थ्य लोकमान्य टिळकांमध्ये, विन्सेट चर्चिलमध्ये म्हणा वा अन्य पाश्चात्य जाणकारांमध्ये होते, ते सामर्थ्य महाराष्ट्रातील लेखकांमध्ये दिसून आले नसल्याची खंतही द्वादशीवार यांनी बोलून दाखविली. याला कारण म्हणजे, गांधींनी स्वत:चे विचार सूत्रबद्ध पद्धतीने कुठेच लिहून ठेवलेले नाही. माझे जीवन हीच माझी विचारपद्धती, असे त्यांचे म्हणणे होते. महाराष्ट्र मार्क्सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, आंबेडकरवादी आणि गांधीवादी अशा वैचारिक प्रवाहात विभागला गेला आहे. गांधीवादी वगळता इतर सर्ववादी गांधींचे विरोधक ठरले आहेत. मार्क्सवादाचा पराभव गांधींनी लेनिनच्या हयातीतच केला.
कामगार व शेतकऱ्यांचा विचार प्रबळ करणारा मार्क्सवाद भारतातील कामगार व शेतकऱ्यांनी गांधी विचारांमुळे नाकारला. समाजावाद्यांनी हवा तेवढा गांधी मंजूर करून, इतर तत्त्वे नाकारली. हिंदुत्ववाद्यांनी गांधीला फाळणीस जबाबदार धरून, मुस्लिमप्रेम म्हणून गांधींचा विरोध केला. तर, आंबेडकरवाद्यांनी गोलमेज परिषदेमध्ये गांधींनी स्वत:ला सबंध भारतीयांचा मी एकटाच प्रतिनिधी असल्याचे संबोधल्याने, गांधींचा विरोध केला. मात्र, एक कुटुंबप्रमुख म्हणून गांधींनी सगळ्यांना कुरवाळल्याचे द्वादशीवार म्हणाले.
लोकमान्य टिळकांनी स्वत: महात्मा गांधी यांना काँग्रेसचे पुढचे नेतृत्व म्हणून पुढे केले होते. मात्र, त्या काळातील लेखक सवर्णीय विशेषत: ब्राह्मण वर्गातील असल्याने, प्रारंभी ते लोकमान्य टिळक, नंतर सावरकर आणि पुढे संघाच्या प्रभावातच राहिले आणि गांधी आपसुकच नाकारल्या गेला. त्या काळात बहुजनांच्या लेखनाला मान्यता नव्हती. महिलांनी गांधींवर लिहिलेली लोकगीते प्रसारित झाली नाहीत. जे आघाडीचे लेखक होते ते वेगवेगळ्या विचारांच्या प्रभावाखाली होते आणि गांधी दुर्लक्षिले गेल्याची भावना सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली. एकूणच गांधींना समजण्याच्या चक्रात ब्राह्मण, सावरकर आणि संघ अडथळा बनल्याचे ते म्हणाले. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले, तर आभार प्रमोद वाटकर यांनी मानले.
नागपूर हे गांधी विचार आणि विरोधकांचे कुरुक्षेत्र - अभय बंग
नागपूर हे गांधी विचार आणि गांधीविरोधकांचे कुरुक्षेत्र आहे. या क्षेत्रावर ८० वर्षे गांधी विचाराच्या काँग्रेसचे वर्चस्व राहिले आणि आता गांधींचा विरोध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गड असल्याचे प्रतिपादन उद्घाटनीय भाषणात अभय बंग यांनी केले. महाराष्ट्रातील वैचारिक आणि ललित वाङ्मय क्षेत्रात गांधी दिसत नाहीत. ढोबळमानाने मराठी लेखकांनी गांधींची सुरुवातीला उपेक्षा केली, मग उपहास केला, नंतर उग्र विरोध केला आणि सरतेशेवटी गांधींचा खून करून मोकळे झाल्याची टीका बंग यांनी मराठी साहित्यिकांबाबत केली. १९०९ साली भारत भवनात जेव्हा गांधी आणि सावरकर आमने-सामने आले, तेव्हा सावरकरांच्या विचारांमुळे गांधी अस्वस्थ झाले. तेव्हापासून शंभर वर्षांहून अधिक काळ झाला... गांधी विरुद्ध सावरकर हा संघर्ष सुरू असल्याचे अभय बंग म्हणाले.
नुसते गांधी नको, शिवाजी आणि सावरकरही हवेत - सिद्धार्थविनायक काणे
साहित्यिक हा खरा साहित्यिक असेल तर तत्त्वज्ञान समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. गांधी एक स्वभावधर्म आहे आणि तो प्रत्येकातच वसतो. मात्र, नुसते गांधी होऊन चालणार नाही तर, कधी शिवाजी महाराज तर कधी सावरकरही व्हावे लागेल, अशी भावना डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली. महाराष्ट्रातील लेखकांनी गांधींवर चिंतन केले नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. गांधींबद्दल लिहिणे म्हणजे गांधी विचार आत्मसात केला, असे होत नाही... असे चिंतनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: There is no judge in Maharashtra who gives justice to Gandhi: Suresh Dwadashiwar regretted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.