शांतता साधनाने नाही साधनेने मिळते
By Admin | Updated: September 21, 2014 01:12 IST2014-09-21T01:12:43+5:302014-09-21T01:12:43+5:30
मनाला शांती साधनाने नाही तर साधनेने मिळते. साधन तत्कालीन सुख देते पण साधना चिरंतन आनंद देते, असे मत मुनीश्री सुवीरसागर यांनी शनिवारी व्यक्त केले. चिटणीस पार्क, महाल येथे महाराजांच्या भव्य

शांतता साधनाने नाही साधनेने मिळते
मुनीश्री सुवीरसागर : श्री सैतवाळ जैन संघटन मंडळ
नागपूर : मनाला शांती साधनाने नाही तर साधनेने मिळते. साधन तत्कालीन सुख देते पण साधना चिरंतन आनंद देते, असे मत मुनीश्री सुवीरसागर यांनी शनिवारी व्यक्त केले. चिटणीस पार्क, महाल येथे महाराजांच्या भव्य प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मनाला शांतता कशी मिळेल, या विषयावर महाराज प्रवचन देत होते. सुवीर संस्कार मंच आणि चातुर्मास कमेटी सकल जैन समाज यांच्यावतीने महाराजांच्या प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराज म्हणाले, संतांच्या पादप्रक्षालनाने सर्व पापांचे प्रक्षालन होते. आकांक्षा निर्माण झाली तर मन सातत्याने अशांत राहते. शांतता आपल्याजवळच असते. शांतता बाहेर शोधण्याची मुळातच गरज नसते. एकाग्रतेने ईश्वराचे नामस्मरण केले तर शांतीचा अनुभव होतो. आज आपण आपलीच संस्कृती विसरत चाललो आहोत. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून शाळांमध्ये संस्कृत शिकविले गेले पाहिजे. यातूनच आपली संस्कृती आपण सांभाळू शकू. संग्रह करण्याची वृत्ती सोडून आपल्या गरजेपुरतेच आपण आपल्याजवळ बाळगले पाहिजे. पण आपल्या गरजा आपणच सातत्याने वाढवित असतो. मुनी आणि संतासाठी योग्य व्यवस्था करण्याचा प्रयत्न समाजाने केला पाहिजे. कारण संत आपल्या जीवनाचे सार आपल्याला सांगून योग्य मार्गाने नेत असतात. मुनी सुवीरसागरजी यांनी प्रवचनासाठी भाविकांनी केलेल्या गर्दीची प्रशंसा केली. महाराज म्हणाले, आपली संस्कृती लोप पावते आहे. पहिले अतिथी देवो भव असायचे. आता कुत्र्यांपासून सावधान असे घरांवर लिहिले असते. ही प्रवचनमाला चिटणीस पार्क, महाल येथे सुरु असून रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी प्रभु की पुकार विषयावर महाराजांचे प्रवचन सकाळी ८ वाजता होणार आहे. या प्रवचनाला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)