शिवणगावातील मुलांसाठी पुनर्वसन ठिकाणी शासकीय शाळाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:32+5:302021-02-08T04:08:32+5:30
नागपूर : मिहान प्रकल्पांतर्गत राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) शिवणगावची जमीन अधिग्रहित केल्यानंतर तेथील प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे पुनर्वसन ...

शिवणगावातील मुलांसाठी पुनर्वसन ठिकाणी शासकीय शाळाच नाही
नागपूर : मिहान प्रकल्पांतर्गत राज्य शासनाच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) शिवणगावची जमीन अधिग्रहित केल्यानंतर तेथील प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांचे पुनर्वसन वर्धा रोडवरील चिंचभुवन येथे करण्यात आले. आता जवळपास १२०० पैकी ८०० कुटुंबे नव्या ठिकाणी राहत आहेत; पण या जागी कुठलीही शासकीय शाळा नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन शैक्षणिक सत्रात शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
पूर्वी शिवणगावात महापालिकेची शाळा होती, आता या ठिकाणी का नाही, असा सवाल करीत शेतकऱ्यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महापालिकेची शाळा सुरू करण्याची मागणी केली. नितीन गडकरी एका कार्यक्रमासाठी चिंचभुवन मार्गाने कार्यक्रमस्थळी गेले होते. या मार्गावर शेतकऱ्यांनी गडकरी यांची भेट घेतली. या संदर्भात गडकरी चर्चा करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मिहान प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे म्हणाले, शिवणगाव आणि लगतच्या गावातील शेतकऱ्यांची मुले पहिली ते दहावीपर्यंतच्या महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होती. पण आता शिवणगावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन चिंचभुवन येथे करण्यात आल्याने या ठिकाणीही महापालिकेची शाळा असायला हवी. चिंचभुवनलगत पाच कि.मी. परिसरात कुठलीही शासकीय शाळा नाही. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना खासगी शाळेत जास्त फी देऊन शिक्षण घेणे परवडणारे नाही. मिहानच्या अधिकाऱ्यांनी मुलांसाठी महापालिकेची शाळा सुरू करण्यासाठी बांधकाम पूर्वीच करायला हवे होते. नवीन शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रवेश कुठे घ्यावा, असा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुलांना वाऱ्यावर सोडून एका खासगी शाळेला काही एकर जागा दिली. या शाळेचे बांधकामही सुरू असून नवीन शैक्षणिक सत्रापासून शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी महापालिकेची शाळा सुरू न केल्यास येथील प्रकल्पग्रस्त या खासगी शाळेचा ताबा घेऊन तिथे वर्ग सुरू करतील, असा इशारा बाबा डवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. नितीन गडकरी यांच्याशी भेटीदरम्यान १०० पेक्षा जास्त प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.