युद्धाच्या वेळी भीती नसते, शत्रूला संपविणे हेच लक्ष्य ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST2021-07-26T04:08:38+5:302021-07-26T04:08:38+5:30
निशांत वानखेडे नागपूर : युद्धाच्या वेळी शत्रूकडून फायरिंग सुरू असताना तुम्हाला भीती वाटत नाही का, असा प्रश्न केला जाताे. ...

युद्धाच्या वेळी भीती नसते, शत्रूला संपविणे हेच लक्ष्य ()
निशांत वानखेडे
नागपूर : युद्धाच्या वेळी शत्रूकडून फायरिंग सुरू असताना तुम्हाला भीती वाटत नाही का, असा प्रश्न केला जाताे. मात्र एकदा सीमेवर गेले की ‘भीती’ नावाचा शब्दच नाहीसा हाेताे. शत्रू समाेर असला की रक्त आपाेआप सळसळते. समाेरच्या शत्रूला संपवायचे किंवा देशासाठी बलिदान करायचे, हा एकच ध्यास मनात असताे आणि कारगिल युद्धाच्या वेळीही तेच ध्येय हाेते. काटाेलचे रहिवासी नायक रत्नाकर ठाकरे यांच्याकडून युद्धाचा थरार ऐकताना अंगावर काटा उभा राहिला.
मूळचे मराठा बटालियनचे असलेले नायक ठाकरे त्यावेळी द्रास सेक्टरला पाेस्टिंगवर हाेते. विविध बटालियनमधून निवडलेल्यांच्या टीममध्ये त्यांचाही समावेश हाेता. ४ मे राेजी हालचाली हाेत असल्याची माहिती मिळाली व २० मेपर्यंत चित्र स्पष्ट हाेत गेले. द्रास सेक्टरमध्ये आम्ही तैनात झालाे. सुरुवातीलाच मनजित सिंह हा अवघ्या १८ वर्षाचा तरुण शहीद झाला हाेता. त्यामुळे प्रत्येकाचे रक्त खवळले हाेते. वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा करायची आणि समाेर कूच करत जायचे, हे सत्र चालले हाेते. समाेरून पाकिस्तानी सैन्याची फायरिंग सुरू असायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचाे. दिवसभर एका ठिकाणी बसून रेकी करायची आणि रात्रीच्या किर्र अंधारात कूच करायची. ५३ दिवस हा लढा चालला हाेता. २६ जुलैला आमच्या जवानांनी टायगर हिल्सवर तिरंगा फडकाविला आणि आमचे ऊर भरून आले. ताे खरेच भावनिक क्षण हाेता. मनात एकच गाणे हाेते, ‘अपनी आझादी काे हम हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते है लेकीन सर झुका सकते नहीं...’
परतलाे तेव्हा घरच्यांचे ऊर भरून आले
नायक ठाकरे यांच्या लग्नाला अवघी तीन वर्षे झाली हाेती. एक मुलगी हाेती. कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर माझी पाेस्टिंग त्यात झाल्याचे समजताच पत्नी बेशुद्ध पडली हाेती. गावकऱ्यांनी तिला समजावले. मात्र हा संपूर्ण काळ कुटुंबासाठी कठीण हाेता. त्यावेळी पत्रव्यवहार हाच आधार हाेता. युद्धाच्या काळात तेही कमी झाले. ‘मी बरा आहे, तुम्ही काळजी घ्या’, एवढेच शब्द सुचायचे. युद्ध संपल्यावर १२ ऑगस्टला घरी परतलाे तेव्हा घरच्यांचा ऊर भरून आला हाेता. चिमुकलीला डाेळा भरून बघितले. गावकऱ्यांनी जल्लाेषात स्वागत केले. माझ्या हस्ते झेंडा फडकविला गेला. यापेक्षा माेठा अभिमान एका सैनिकासाठी काय असताे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.