आरोपींवरच्या कारवाईवर निर्णय नाही
By Admin | Updated: September 30, 2014 00:37 IST2014-09-30T00:37:47+5:302014-09-30T00:37:47+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्यात सामील आरोपींवरील कारवाईसंदर्भात पोलिसांचा निर्णय झालेला नाही. आज, सोमवारी पोलिसांनी वेळ वाढवून मागितल्यामुळे मुंबई उच्च

आरोपींवरच्या कारवाईवर निर्णय नाही
रोस्टर घोटाळा : पोलिसांनी घेतला वेळ
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळ्यात सामील आरोपींवरील कारवाईसंदर्भात पोलिसांचा निर्णय झालेला नाही. आज, सोमवारी पोलिसांनी वेळ वाढवून मागितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणावरील पुढील सुनावणी दिवाळीच्या सुट्यांनंतर निश्चित केली.
सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक संजय वेरणेकर यांनी ८ सप्टेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून कारवाईसंदर्भात दोन आठवड्यांत निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. परंतु, त्यांना वेळेचे बंधन पाळता आले नाही. विद्यापीठ सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रोस्टर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी प्रा. सुनील मिश्रा यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. २००२ ते २००८ या कालावधीत राखीव प्रवर्गातील ५०६ नियुक्त्यांमध्ये झालेला गैरप्रकार ‘रोस्टर घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जी. जी. लोणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने ५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना अहवाल सादर करून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविण्याची शिफारस केली आहे. घोटाळ्यात वजनदार आरोपी सामील असल्यामुळे पोलीस दबावात असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात यावी व न्यायालयात कृती अहवाल सादर करण्यात यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.(प्रतिनिधी)