अणेंच्या मुद्यावरून विधान परिषदेत गोंधळ
By Admin | Updated: December 16, 2015 03:10 IST2015-12-16T03:10:42+5:302015-12-16T03:10:42+5:30
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी सरकारला दिले होते.

अणेंच्या मुद्यावरून विधान परिषदेत गोंधळ
कामकाज तहकूब : सरकारतर्फे उद्या निवेदन
नागपूर : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मांडलेल्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेसंदर्भात मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी सरकारला दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत निवेदन सादर करण्यात आले नव्हते. हा सभापतींचा अवमान असल्याचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी सदस्यांनी निवेदन करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणे यांच्याकडून वक्तव्याची माहिती घेतल्यानंतरच भूमिका स्पष्ट करता येईल, असे निदर्शनास आणले. यावर नाराजी व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातल्याने तालिका सभापती नरेद्र पाटील यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
अणे यांनी राज्याचे महाधिवक्ता म्हणून शपथ घेतलेली असल्याने त्यांना कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक मत व्यक्त करता येत नाही. त्यांच्या वक्तव्यावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
सर्वपक्षीय सदस्यांनी अणेंसदर्भात भूमिका मांडल्यानंतर सभापतींनी सरकारला निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु मुख्यमंत्री त्यांच्या वक्तव्यावर पांघरुण घालत असल्याचा आरोप संजय दत्त यांनी केला. बुधवारी सकाळपर्यंत या संदर्भात सरकारने निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली. एखादा घटनात्मक मुद्दा उपस्थित झाल्यानतंर तो प्रश्न प्राधान्याने विचारात घेण्याची गरज असल्याचे शरद रणपिसे यांनी निदर्शनास आणले. बुधवारी सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी अणेंच्या वक्तव्यासंदर्भात निवेदन करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिल्यानंतर सभागृहातील गोंधळ शमला.
तत्पूर्वी सकाळी लक्षवेधीवरील चर्चा संपल्यानंतर मुंडे यांनी अणे संदर्भातील निवेदनाचा मुद्दा उपस्थित केला होता.
यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी निवेदन सादर क रण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु उपसभापती वसंत डावखरे यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले होते. सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात अणेंच्या मुद्यावरून सरकाची कोंडी झाल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)