देशातील मूलभूत परिवर्तनाला दिशा मिळते आहे

By Admin | Updated: July 5, 2015 03:03 IST2015-07-05T03:03:30+5:302015-07-05T03:03:30+5:30

सध्या भारत एका संक्रमणातून जात आहे. जागतिक पातळीवर देशाची स्थिती बदलते आहे कारण नागरिक सुजाण होत आहेत.

There is a direction of basic change in the country | देशातील मूलभूत परिवर्तनाला दिशा मिळते आहे

देशातील मूलभूत परिवर्तनाला दिशा मिळते आहे

नागपूर : सध्या भारत एका संक्रमणातून जात आहे. जागतिक पातळीवर देशाची स्थिती बदलते आहे कारण नागरिक सुजाण होत आहेत. केवळ राजकारणाच्या भरवशावर राहून देशाचा विकास होणार नाही तर त्यासाठी सजग नागरिकांचा दबावगट निर्माण होणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी राजकारण प्रासंगिक राहिले असले तरी केवळ सत्तेसाठी असलेल्या राजकारणाने नुकसान होण्याचाच संभव आहे पण संघर्ष, विचार निर्माण, चारित्र्य , रचनात्मक कार्य आणि सत्तेवर अंकुश असल्याशिवाय यापुढे राजकारण करता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना या घटकांचा विचार करूनच राजकारण करावे लागते आहे. यातूनच निश्चितपणे मूलभूत परिवर्तनाला आता प्रारंभ झाला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक योगेंन्द्र यादव यांनी व्यक्त केले.
जनमंचतर्फे न्या अशोक देसाई स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन साई सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी ‘२१ व्या शतकातील भारत : नवी दिशा, नवी आव्हाने’ विषयावर योगेन्द्र यादव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे तर प्रमुख अतिथी म्हणून जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, शरद पाटील, राजीव जगताप आणि प्रमोद पांडे उपस्थित होते. यादव यांनी तीन मुद्यांच्या आधारावर २१ व्या शतकातला भारत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले कच्चे दुवेही सांगितले. धर्मनिरपेक्षता, सामाजिक आरक्षण आणि आर्थिक सुधारणा या मुद्यांवर त्यांनी भर दिला. या वादाच्या मुद्यांवर एकमत होत नाही पण देशाच्या हितासाठी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची गरज सध्या सर्वाधिक आहे. २० व्या शतकाचे वैचारिक संचित समजून घेत आपला देश प्रगतिपथावर आहे. धर्मनिरपेक्षता हेच आपल्या देशाचे मूळ आहे आणि विविधता हीच आपली शक्ती आहे. पण धर्मनिरपेक्षतेच्या नावावर अल्पसंख्यांकांना असुरक्षित ठेवण्याचे पाखंड थांबले पाहिजे.
जाती आधारीत समाजव्यवस्थेमुळे संधीची असमानता आहेच. ती नाकारता येत नाही. त्यामुळेच आरक्षणाला काहींचा विरोध असला तरी त्याची नितांत गरज आहे सामान्य माणसाला लाभ पोहोचविण्याचा विचार होत नाही. यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रकाश दुबे म्हणाले, राजकीय पक्ष केवळ आश्वासने देतात. ती पाळली जात नाही आणि जनता त्यावरच विचारच करीत नाही त्यामुळे त्यांना जाब विचारण्याचा प्रश्न दूरच आहे. माध्यमांवर विसंबून राहून स्थिती बदलेल, हे दिवास्वप्न आहे. नागरिकांनीच आता सजगतेने समोर येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अ‍ॅड. अनिल किलोर यांनी जनमंचच्या कार्याची माहिती दिली तर शरद पाटील यांनी या कार्यामागची प्रेरणा सांगितली. संचालन श्वेता शेलगावकर यांनी आणि आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: There is a direction of basic change in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.