शहरात कोविडच्या केवळ ६८२ खाटा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:11+5:302021-03-17T04:08:11+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येने २ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ...

शहरात कोविडच्या केवळ ६८२ खाटा शिल्लक
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सलग चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येने २ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्याच्या स्थितीत मेयोमध्ये २८५, मेडिकलमध्ये ३२०, एम्स ६५, मनपाच्या आयसोलेशनमध्ये १२ व मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ७० रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एम्समध्ये एकही खाट शिल्लक नाही. आयसोलेशन व इंदिरा गांधी रुग्णालय फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. काही खासगी कोविड रुग्णालयांची हीच स्थिती आहे. धक्कादायक म्हणजे शासकीय व खासगी मिळून ३,८६३ खाटांपैकी ३,१८१ खाटा फुल्ल झाल्या आहेत. केवळ ६८२ खाटा शिल्लक आहेत. रोज वाढत्या रुग्णसंख्येमुळे मेयो, मेडिकल फुल्ल झाल्यास पुढे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. चार दिवसांत ९,३९७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १८,९८० झाली आहे. यातील १३,८६२ रुग्ण गृह विलगीकरणात तर ५,११८ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत व कोविड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. सध्याच्या स्थितीत ६ शासकीय तर ८८ खासगी कोविड रुग्णालये आहेत. उपलब्ध माहितीनुसार, शहरात शासकीय रुग्णालये मिळून २,३१३ तर खासगी रुग्णालये मिळून १,५५० अशा एकूण ३,८६३ खाटा आहेत. यात शासकीय रुग्णालये व कोविड केअर सेंटर मिळून ९१९ तर खासगी रुग्णालयांत ४,१०० असे एकूण ३,१८१ रुग्ण उपचाराखाली आहेत. एकूण खाटांच्या तुलनेत केवळ ६८२ खाटा शिल्लक आहेत.
-मेयोमध्ये ३००हून जास्त खाटा वाढविणे अशक्य
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ४४० खाटांचे ‘एचडीयू’ तर १६० खाटांचे ‘आयसीयू’ आहे. सध्या २८५ रुग्ण उपचाराखाली आहेत. परंतु ३०० रुग्णांना सेवा देऊ शकतील एवढेच त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे. खाटा वाढविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ५० डॉक्टर, ५० नर्स, १६ तंत्रज्ञ, ४ केमिस्ट व ५ डाटा ऑपरेटरची मागणी केल्याचे समजते.
-मेडिकलमध्ये ५ आयसीयू फुल्ल
मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमधील ३ आयसीयू व २ एचडीयू अशा ७५ खाटा फुल्ल झाल्या आहेत. नवीन इमारतीत असलेल्या ५० व ५१ क्रमांकाचे दोन आयसीयू असे ५ आयसीयू फुल्ल झाले आहेत. यामुळे ५२ क्रमांकाचे आयसीयू आजपासून रुग्णसेवेत सुरू करण्यात आले. सध्याच्या स्थितीत ४० खाटांचे आयसीयू शिल्लक आहे. याशिवाय, मेडिकलच्या इमारतीत असलेले वॉर्ड क्र. १, २, ११, १२, १३, २५ हे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. एकूण ३२० रुग्ण उपचार घेत आहेत. आणखी ४०० खाटा वाढविण्याचे नियोजन केले जात आहे.
-हजार खाटा वाढविण्याचे प्रयत्न सुरू
शासकीय रुग्णालयांमध्ये मर्यादित खाटा आहेत. त्यात किती खाटा वाढू शकतात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही खाटा वाढविण्याचा प्रयत्न आहे. खासगी कोविड रुग्णालयांमध्ये आणखी दोन नव्या रुग्णालयांची भर पडणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये हजार खाटा वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
- जलज शर्मा,
अतिरिक्त आयुक्त, मनपा
-शहरातील कोविड खाटांची स्थिती
शासकीय रुग्णालयांमध्ये एकूण खाटा : १५५०
एकूण आयसीयू खाटा : ३१९
एकूण ऑक्सिजन खाटा : १,१७७
एकूण व्हेंटिलेटर : २७०
खासगी रुग्णालयांमध्ये एकूण खाटा : १,३१३
एकूण आयसीयू खाटा : ८३२
एकूण ऑक्सिजन खाटा : १,४२३
एकूण व्हेंटिलेटर : २१४