१००० शाळांत मैदान नाही
By Admin | Updated: March 25, 2015 02:21 IST2015-03-25T02:21:26+5:302015-03-25T02:21:26+5:30
शिक्षणासोबतच ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत प्रोत्साहन दिले जाते.

१००० शाळांत मैदान नाही
लोकमत जागर
नागपूर : शिक्षणासोबतच ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत प्रोत्साहन दिले जाते. परंतु जिल्ह्यातील १००० शाळांना खेळाचे मैदान नसल्याने ग्रामीण भागात चांगले खेळाडू कसे निर्माण होतील, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
जिल्ह्यात २४४३ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यात जिल्हा परिषद व खासगी शाळांचा समावेश आहे. यातील जि.प.च्या ८५९ तर १७६ खासगी शाळांना खेळाचे मैदान नाही. प्राथमिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्याचा शारीरिक विकास होण्यासाठी शासनाकडून क्र ीडा स्पर्धांना प्रोत्साहन दिले जाते. परंतु खेळाचे मैदान नसलेल्या शाळातून चांगले खेळाडू कसे निर्माण होतील. जि.प.च्या सेस फंडात क्रीडा स्पर्धासाठी जेमतेम २५ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यातून कोणत्या स्पर्धा आयोजित करणार, असा प्रश्न जि.प. शिक्षकांना पडला आहे.
८२५ शाळांना संरक्षक भिंत नाही. स्वतंत्र वर्ग खोल्या नसलेल्या वर्गांची संख्या १,७४५ आहे. त्यामुळे एकाच खोलीत दोन वर्गाच्या विद्याथ्यांंना बसावे लागते. याचा शिक्षणावर परिणाम होतो.
विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र शौचालय नसलेल्या शाळांची संख्या ३०० च्या आसपास आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची कुचंबणा होते. जिल्ह्यातील १०००शाळांना किचनशेड नाही.फायबरचे किचनशेड उभारण्याची योजना हाती घेण्यात आली होती. परंतु फायबरचा दर्जा निकृष्ट असल्याचा आक्षेप जि.प.सदस्यांनी घेतल्याने काम थंडावले. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याचे जि.प.शाळातील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. (प्रतिनिधी)