...तर पूर्ण परिसर सील होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST2021-02-20T04:22:33+5:302021-02-20T04:22:33+5:30
५ रुग्ण आढळल्यास इमारत व फ्लॅट स्कीम, तर २० रुग्ण आढळल्यास रस्ता अन् परिसर प्रतिबंधित घोषित होणार लोकमत न्यूज ...

...तर पूर्ण परिसर सील होणार
५ रुग्ण आढळल्यास इमारत व फ्लॅट स्कीम, तर
२० रुग्ण आढळल्यास रस्ता अन् परिसर प्रतिबंधित घोषित होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रकोप थांबविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले आहे. पूर्वीप्रमाणेच आता हळहळू प्रतिबंध लावले जाणार असून, पाचपेक्षा अधिक काेरोनाचे रुग्ण आढळून आल्यास संबंधित इमारत व फ्लॅट, स्कीम प्रतिबंधित करण्यात येईल. तसेच २०पेक्षा अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या परिसरातील रस्ता आणि परिसर सील करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी शुक्रवारी काढले आहेत. यासंदर्भात संबंधित सहायक आयुक्त व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
या आदेशानुसार अंत्यसंस्काराकरिता २०पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. अंत्यसंस्काराकरिता उपस्थित सर्व व्यक्तींनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. ज्या कोरोनाबाधित रुग्णांना होम क्वाॅरंटाइन, आयसोलेशन करण्यात आले, त्या रुग्णांनी घराबाहेर निघू नये, तसेच क्वाॅरंटाइनविषयक नियमांचे पालन करावे, संबंधित सहायक आयुक्त, झोनल वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधितांचे डाव्या हातावर होम क्वाॅरंटाइनचे शिक्के मारण्याबाबत आवश्यक कार्यवाही आपल्या अधिनस्थ यंत्रणेमार्फत करावी. रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्यगृह हे एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवावे. त्यासंबंधी शर्तीचे काटेकोर पालन व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार संबंधित सहायक आयुक्त व संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
बॉक्स
नागरिकांवरही कडक दंडात्मक कारवाई
परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. नियमांचे पाालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत, गर्दी करतील, नियमांचे उल्लंघन करतील त्या सर्व नागरिकांवर कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेशही मनपा आयुक्तांनी बजावलेले आहेत.