जलसंपदा मंत्री पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख पोहचले उपोषणस्थळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी देण्याची ग्वाही दिली होती. परंतु शहरातील काही भागात अजूनही दूषित पाणीपुरवठ्याची समस्या आहे. पाणी बिलात दरवर्षी ५ टक्के वाढ होत आहे. ती तर्कसंगत नाही. याला आळा बसला पाहिजे. ओसीडब्ल्यूच्या नियुक्तीत अनियमितता झाली असेल तर महापालिकेने याची चौकशी केली पाहिजे. मनपा चौकशी करणार नसेल तर राज्य सरकारकडून चौकशी केली जाईल. अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांना लिंबूपाणी देऊन मनपा कार्यालयापुढे सुरू असलेले त्यांचे उपोषण सोडविले.
वर्ष २०१०-११ मनपाचा जलप्रदाय विभाग हा तीन कोटींनी फायद्यात होता. परंतु मनपातील सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या आधारावर २०१२ मध्ये ओसीडब्ल्यूला पाणीपुरवठ्याचा कंत्राट दिला. मनपा सध्या ५६२ कोटींनी तोट्यात आहे. पाणी बिलात दरवर्षी ५ टक्के वाढ केली जात आहे. शहरातील नागरिकांना २४ बाय ७ पाणी देण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. हा शहरातील नागरिकांवर अन्याय असल्याचे वेदप्रकाश आर्य यांनी सांगितले.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आमदार विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे उपोषणस्थळी पोहचले. माजी मंत्री रमेश बंग, मनपातील राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, प्रकाश गजभिये, प्रशांत पवार, शैलेश पांडे, सुनीता शेंडे, विशाल खांडेकर, वर्षा श्यामकुळे, अशोक काटले आदी उपस्थित होते.
...........................
फोटो ओळी जयंत पाटील व अनिल देशमुख उपोषणकर्ते वेदप्रकाश आर्य यांना लिंबू पाणी देताना.