अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिरातील मूर्तीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST2021-05-25T04:07:47+5:302021-05-25T04:07:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एनआयटी चौकात असलेल्या अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिरातून मूर्ती आणि चांदीचे ...

अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिरातील मूर्तीची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एनआयटी चौकात असलेल्या अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिरातून मूर्ती आणि चांदीचे नारळ चोरणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एका दिवसात छडा लावला. त्याच्या मुसक्या आवळून चोरलेल्या मूर्ती तसेच चांदीचे नारळ जप्त केले. विजय कोठीराम मौंदेकर (वय ४०) असे आरोपीचे नाव असून तो लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घास बाजार बैरागीपुऱ्यात राहतो.
फिर्यादी भूषण मांगीलाल जैन (वय ६२) हे गांधीबागेत राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पुजारी प्रदीप कावळे यांनी अजितनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे दार उघडले. पूजेसाठी ते बाजूला दूध आणण्याकरिता गेले. दहा मिनिटात परत आले तेव्हा मंदिरातील भगवान महावीर स्वामींची तसेच भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती तसेच चांदीचे नारळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुजारी कावळे यांनी ही घटना जैन यांना सांगितली. जैन यांनी लगेच पाचपावली पोलिसांना कळविले. ठाणेदार संजय मेंढे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. त्यांनी मंदिर व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्याआधारे चोरट्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या आरोपीचे छायाचित्र खबऱ्याने ओळखले आणि तो बैरागीपुऱ्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना सांगितली. त्याआधारे रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास आरोपी विजय मौंदेकर याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्या घरातून चोरलेल्या मूर्ती तसेच चांदीचे नारळ जप्त करण्यात आले.
---
गुन्हे अहवालाची चौकशी
आरोपीची कोठडी घेण्यात आली असून त्याने यापूर्वी असे काही गुन्हे केले का, त्याची चौकशी केली जात आहे.
---