नागपूर विद्यापीठातील चोरी प्रकरण, 9 महिन्यानंतर गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 2, 2017 14:35 IST2017-03-02T14:35:13+5:302017-03-02T14:35:13+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातत्व विभागात झालेल्या चोरीप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अखेर ९ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला.

नागपूर विद्यापीठातील चोरी प्रकरण, 9 महिन्यानंतर गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पुरातत्व विभागात झालेल्या चोरीप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अखेर ९ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. विद्यापीठातर्फे विनोद राधेश्याम इलमे (वय ४८) यांनी बुधवारी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागात ठेवलेल्या २६३३ पुरातत्व वस्तू आणि २२४ विष्णुकुंडीत नाणी १० मे २०१६ ला चोरीला गेल्या होत्या.
चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. या प्रकरणात बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी विद्यापीठाने या सर्व मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. अंबाझरी पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गहाळ वस्तूंबाबत गुन्हा कसा दाखल करावा, असा प्रश्न उपस्थित झाला.
चौकशीत या वस्तू चोरीला गेल्या असाव्या किंवा कुणी त्याची परस्पर गैरमार्गाने विल्हेवाट लावली असावी, असा संशय निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाला ठोस भूमिका घेण्याची सूचना केली. त्यासंबंधाने पोलिसांकडून विस्तृत पत्रव्यवहार झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनातर्फे बुधवारी रात्री इलमे यांनी अंबाझरी ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
चोरीला गेलेल्या नाण्यांसोबत उत्खननात सापडलेल्या प्राचीन वस्तूंचा (मूर्ती, भांडी, हत्यार, विविध वस्तू) समावेश आहे. या तक्रारीवरून ठाणेदार प्रसाद सबनिस यांनी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक सुरोसे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.