सरसंघचालकांच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात फडकला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2022 21:42 IST2022-08-13T21:41:31+5:302022-08-13T21:42:01+5:30
Nagpur News शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल, नागपूर येथील मुख्यालयातही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

सरसंघचालकांच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात फडकला तिरंगा
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला शनिवारी दि. १३ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. त्याअनुषंगाने शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल, नागपूर येथील मुख्यालयातही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात व अन्य कार्यालयांत दरवर्षी गणराज्य दिन व स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण होत असते. परंतु, यंदा ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधीच ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यालयात लागणाऱ्या प्रभात शाखेत हा ध्वजारोहणाचा उपक्रम पार पडला. यावेळी मोहिते शाखेचे स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारीदेखील उपस्थित होते. १५ ऑगस्टपर्यंत तिरंगा ध्वज फडकत राहणार आहे.
यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनोत्सव पथसंचलनाद्वारे साजरा केला जातो. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनी सोमवारी संध्याकाळी ५ वाजता विदर्भ प्रांताद्वारे विदर्भातील १५४ तालुकास्थळी व नगरस्थळांवर एकाच वेळी पथसंचालन आयोजित करण्यात आले आहे. संघातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याच श्रृंखलेतील हा कार्यक्रम आहे. घोष व गीताच्या तालावर हे संचलन होईल. संघाचे अधिकारी विविध ठिकाणी पथसंचलनाचे अवलोकन करतील, अशी माहिती विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे व प्रांत सह संघचालक चंद्रशेखर राठी यांनी दिली.
सोशल मीडियावरील डिपीपर तिरंगा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तिरंगा, असा वाद विरोधकांकडून मुद्दामहून निर्माण करण्यात येत असतो. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून हा वाद पुन्हा उकरण्यात येत असून, संघाने आपला डीपी न बदलल्याची ओरड करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारीच संघाच्या सर्व सोशल माध्यमांवरील डीपी, स्टेट्समध्ये तिरंगा ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
..............