शल्यचिकित्सकाएवढीच फिजिओथेरपीस्टची भूमिका महत्त्वाची
By सुमेध वाघमार | Updated: April 8, 2024 19:27 IST2024-04-08T19:27:14+5:302024-04-08T19:27:40+5:30
तज्ज्ञाचा सूर : मेडिकलच्या फिजीओथेरपी स्कूल अॅण्ड सेंटरचा पदवीदान सोहळा

शल्यचिकित्सकाएवढीच फिजिओथेरपीस्टची भूमिका महत्त्वाची
नागपूर : अपघातात जखमीला पूर्णत: बरे करण्याची जेवढी शल्यचिकित्सकाची भूमिका महत्त्वाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका फिजीओथेरपीस्टची असते. शल्यक्रिया १०० टक्के यशस्वी झाली तरी त्या रुग्णाचे आजारातून पुनर्वसनकरण्याची मोठी जबाबदारी फिजीओथेरपीस्टची असते, असा सूर तज्ज्ञाचा होता.
मेडिकलच्या फिजीओथेरपी स्कूल अॅण्ड सेंटरचा पदवीदान सोहळा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) सभागृहात पार पडाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशीकच्या अलाइड हेल्थ फॅकल्टीचे अधिष्ठाता डॉ. वाय. प्रवीण, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी, मेडिकलमधील आॅक्युपेश्नल स्कूल अॅण्ड सेंटरच्या प्राचार्य डॉ. सोफिया आझाद व मेडिकलच्या फिजीओथेरपी स्कूल अॅण्ड सेंटरच्या प्राचार्य डॉ. उमांजली दमकेउपस्थित होत्या. या सर्वांनी फिजीओथेरपीस्टचे महत्त्व विषद केले. या सोहळ्यात ‘एमपीटीएच’ कार्डिओरेस्पिरेटरीच्या दोन तर ‘बीपीटीएच’च्या २७ विद्यार्थ्यांना चांगल्या व्यावसायिक आचरणाची आणि समाजाची नि:स्वार्थ सेवा करण्याची शपथ देण्यात आली.
-मेडिकलचे विद्यार्थी रुग्णांना हाताळण्यास सक्षम
डॉ. दमके यांनी महाविद्यालयाने राबविलेले वार्षिक उपक्रमाची माहिती दिली. त्या म्हणाल्या,
फिजिओथेरपी विभागात ‘आयसोकिनेटिक’ उपकरण आहे, जे जखमी खेळाडुंच्या पुनर्वसनासाठी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी महत्वाचे ठरत आहे. कॉलेजने ‘आयसोकिनेटिक ह्युमॅक नॉर्म’वर अनेक अभ्यास केले आहेत. या शिवाय अनेक महत्त्वाची उपकरण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथील पदव्युत्तर विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी एनआयसीयू, पीआयसीयू, एसआयसीयू, सीव्हीटीएस, आयसीयू, श्वसनरोग विभागात नेमणूक केली जाते. यामुळे मेडिकल फिजिओथेरपीमधून पदवीधर झालेला विद्यार्थी जगात कुठेही कोणत्याही प्रकारच्या फिजिओथेरपी रुग्णांना हाताळण्यास सक्षम असतो.