विमान उतरले पण उघडले नाही ‘लगेज डोअर’; एक तासाचा झाला खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 21:19 IST2022-09-16T21:19:08+5:302022-09-16T21:19:44+5:30
Nagpur News ‘लगेज डोअर’ न उघडल्यामुळे शुक्रवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना जवळपास तासभर अडकून रहावे लागले.

विमान उतरले पण उघडले नाही ‘लगेज डोअर’; एक तासाचा झाला खोळंबा
नागपूर : ‘लगेज डोअर’ न उघडल्यामुळे शुक्रवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना जवळपास तासभर अडकून रहावे लागले. यामुळे मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांनाही उशीर झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी विमान क्रमांक ६२७ उतरले. विमानातून प्रवासी उतरले; परंतु प्रवाशांचे सामान ठेवलेला विमानाचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे नागपुरात वेळेवर पोहोचूनही प्रवासी वेळेवर आपल्या घरी उशिराने पोहोचले. विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, या विमानाच्या कार्गो होल्ड एरियात एका कॅन्सर रुग्णाचे औषध ठेवले होते. औषधाच्या या पार्सलमुळे कार्गो होल्ड एरियात व्हॅक्युम तयार होऊन प्रेशर तयार झाले आणि त्यामुळे लगेज डोअरचे हँडल उघडत नव्हते. यामुळे या विमानाने आलेल्या प्रवाशांना सामानाची वाट पाहत तासभर विमानतळावर अडकून पडावे लागले. एवढेच नव्हे तर या विमानाने नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनाही एक तास उशीर झाला.
..............