विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 20:18 IST2022-10-07T20:17:27+5:302022-10-07T20:18:02+5:30
Nagpur News विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार आहे, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार
नागपूर : भटक्या विमुक्तांच्या मागण्यांकडे केंद्र शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आजवर त्यांना न्याय मिळू शकला नाही. पश्चिम महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जमाती संघटनेने शेकडो मोर्चे काढून भटक्या विमुक्तांमध्ये जनजागृती केली. विदर्भात आजपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही याची खंत आहे. त्यामुळे यापुढे विदर्भात भटक्या विमुक्तांचे संघटन बळकट करणार आहे, अशी माहिती भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी आयोजित ५० व्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आजपर्यंत सर्व आयोगांनी भटक्या विमुक्तांचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या शिफारस केल्या. परंतु केंद्र शासनाने या शिफारसी मान्य केल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. परंतु विदर्भात आम्ही उशिरा पोहोचल्याची खंत असून, अधिवेशनात विविध विषयांवर विचारमंथन होणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक मस्के, मिलिंद हिवरेकर आदी उपस्थित होते.
पवारांना ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ किताब
भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वाजता भटक्या विमुक्त जमाती संघटना वाटचाल आणि दिशा यावर, तर दुपारी २.३० वाजता वैदर्भीय भटक्या विमुक्तांवर चर्चा होईल. दुपारी ४ वाजता मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर राहतील. समारंभात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना शाहु शहाजी छत्रपती महाराज, कोल्हापूर यांच्या हस्ते ‘लोकशाही समाजवादाची राखण करणारा जाणता राजा’ किताब बहाल करण्यात येणार आहे.
..........