लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मध्यप्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेसाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला वाहतुकीची परवानगी असताना, एसटी महामंडळाच्या बसेसला मध्य प्रदेश परिवहन विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आणि एसटीनेच नागद्वार यात्रा होईल, असा दावा आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे.
विदर्भ व नागपुरातून मोठ्या प्रमाणावर भाविक नागद्वार यात्रेसाठी पचमढीला जातात. या यात्रेसाठी नागरिकांना कमी खर्चामध्ये आणि सुरक्षित रित्या एसटी महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ होतो. मात्र एसटी बसेसला परवानगी न मिळाल्यास खाजगी ट्रॅव्हल्स कडून मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांची पिळवणूक होऊ शकते. त्यामुळे प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व तातडीने मध्यप्रदेश सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री मोहन यादव यांना फोनद्वारे संपर्क करून या घटनेची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र शासनाकडून मध्य प्रदेश शासनाला लवकरच पत्रव्यवहार करून महाराष्ट्रातून जाणाऱ्या बसेसला परवानगी मिळवून देणार असल्याचे दटके यांनी सांगितले.