हायकोर्टाने मागितला नररुपी सैतान राजू बिरहाच्या वागणुकीचा अहवाल
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 12, 2023 17:30 IST2023-10-12T17:27:26+5:302023-10-12T17:30:07+5:30
हिंगणामधील तिहेरी खूनात फाशीची शिक्षा सुनावलेला आरोपी

हायकोर्टाने मागितला नररुपी सैतान राजू बिरहाच्या वागणुकीचा अहवाल
नागपूर : वागदरा शिवार येथील चहा व पान टपरीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर तीन मित्रांचा शहाळे कापण्याच्या सत्तूरने निर्घृण खून करणारा नररुपी सैतान राजू छन्नूलाल बिरहा (५५) याच्या शिक्षेवर निर्णय जाहीर करायचा असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बिरहाची कारागृहातील वागणूक कशी आहे, त्याने कोणकोणती कामे केली, कोणकोणत्या उपक्रमात सहभाग घेतला, त्याला कारागृहातील गैरकृत्याकरिता शिक्षा झाली का इत्यादी माहितीचा अहवाल मागितला आहे. कारागृह अधिक्षकांना येत्या मंगळवारपर्यंत हा अहवाल सादर करायचा आहे.
सत्र न्यायालयाचे बिरहाला २८ डिसेंबर २०२२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले आहे. तसेच, या शिक्षेविरुद्ध बिरहाने अपील दाखल केले आहे. या प्रकरणावर गेल्या जुलैमध्ये न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला. दरम्यान, बिरहा १७ नोव्हेंबर २०१५ पासून कारागृहात असल्याची बाब लक्षात घेता न्यायालयाने हा अहवाल मागितला. सरकारच्या वतीने ॲड. संजय डोईफोडे तर, आरोपीतर्फे वरिष्ठ ॲड. अनिल मार्डीकर व ॲड. सुमित जोशी यांनी कामकाज पाहिले.
२०१५ मधील घटना
समाजाला हादरवून सोडणारी ही घटना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वागदरा शिवार, ता. हिंगणा येथे घडली. मृतांमध्ये सुनील हेमराज कोटांगळे (३१), आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२६) व कैलाश नारायण बहादुरे (३२) यांचा समावेश आहे. आरोपीने अत्यंत क्रूर व अमानवीय पद्धतीने हा गुन्हा केला आहे.