योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात वर्दळीचा मार्ग असलेल्या वर्धा मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींकडे पाहत एका आरोपीने हस्तमैथुन करत अश्लिल चाळे केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एकीकडे महिला दिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम साजरे करण्यात आले असताना दुसरीकडे असे विकृत खुलेआमपणे चाळे करत असल्याच्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विकृताला शोधण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.
वर्धा मार्गावरील अजनी चौकाकडून रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला आहे. सायंकाळच्या सुमारास फुटपाथवर तरुण-तरुण तसेच ज्येष्ठ नागरिक येऊन बसतात. रविवारी सायंकाळीदेखील काही तरुणी बसल्या होत्या. अचानक एक व्यक्ती तरुणींसमोर आला व त्याने अश्लिल चाळे सुरू केले. या प्रकारामुळे तरुणींना धक्काच बसला. त्याने तरुणींकडे पाहत हस्तमैथुनदेखील केले. काही तरुणींनी दुर्लक्ष केले. मात्र एकीने हिंमत दाखवत त्याचा व्हिडीओ काढला व पोलिसांना फोन लावण्याबाबत इतरांना म्हटले. ते ऐकून संबंधित आरोपी तेथून फरार झाला. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांपर्यंतदेखील हा व्हिडीओ पोहोचला. बजाजनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळाजवळच नागपूर मध्यवर्ती कारागृहदेखील असून या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. अशा पार्श्वभूमीवर हा प्रकार झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.