दरोडा टाकण्यापूर्वीच हातात पडल्या बेड्या; एक फरार, चौघांना अटक
By दयानंद पाईकराव | Updated: December 25, 2023 15:19 IST2023-12-25T15:19:51+5:302023-12-25T15:19:55+5:30
चाकू, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर जप्त

दरोडा टाकण्यापूर्वीच हातात पडल्या बेड्या; एक फरार, चौघांना अटक
नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना बेलतरोडी पोलिसांनी गजाआड करून त्यांच्या ताब्यातून चाकू, लोखंडी रॉड, सब्बल, दोरी, मिरची पावडर जप्त असा एकुण ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११.१० ते १२.४० दरम्यान घडली असून यातील एक आरोपी फरार झाला आहे.
कुणाल भिमराव वाघमारे (वय २८, रा. खापरी पुनर्वसन, वर्धा रोड), राहुल यादवराव गुमेकर (वय ३०, रा. वेशाली नगर, चिंचभवन), शैलेश लिलाधर वासनिक (वय २६, रा खापरी पुनर्वसन, वर्धा रोड) आणि रोशन सुभाष सिंग (वय २५, रा. जयताळा बाजार चौैक झोपडपट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रतिक उर्फ गोलु पटेल (रा. श्रमिकनगर झोपडपट्टी परसोडी) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
बेलतरोडी पोलीसांचे तपास पथक कोंबींग ऑपरेशन राबवित असताना त्यांनी चिंचभवन पुलाकडून शिवनगाव पुनर्वसनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला असलेल्या मोकळ्या मैदानात धाड टाकली. तेथे आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत आढळले. आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चाकू, लोखंडी रॉड, सब्बल, दोरी, मिरची पावडर जप्त असा एकुण ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध कलम ३९९, ४०२, सहकलम ४, २५, १३५ नुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.