योगेश पांडेनागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींत मिळाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सरकारला काहीही लपवायचे नाही व कुणालाही पाठीशी घालणार नाही. चौकशी समितीच्या अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या प्रकरणाबाबत सरकार गंभीर आहे. अहवालात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील माझ्या या मताशी सहमत असतील. आम्ही एकाही मिनिटाची प्रतिक्षा न करता संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले व गुन्हे दाखल केले. या प्रकरणात अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. चौकशी समितीदेखील सखोल तपास करत आहे. याची व्याप्ती किती आहे व आणखी कोण सहभागी आहे याची माहिती यातून समोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार जो करार झाला होता त्यात पैशांचा व्यवहार बाकी होता. मात्र रजिस्ट्री झाली होती. दोन्ही पक्षांनी रजिस्ट्री रद्द करावी असा अर्ज केला आहे. रजिस्ट्री रद्द करताना नियमानुसार पैसे भरावे लागतात. पैसे भरण्याबाबत त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. हे जरी झाले तरी जो फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे तो संपणार नाही. सगळ्या प्रकारची चौकशी करण्यात येईल व कुणालाही यात सोडले जाणार नाही. या संपूर्ण घटनाक्रमाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अधिकृत स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींवरच गुन्हा दाखल
अशा प्रकरणांत जे प्रत्यक्ष स्वाक्षरी करतात किंवा करारात सहभागी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात ज्यांनी विक्री केली, स्वाक्षरी केली, चुकीची नोंदणी, फेरफार केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आत्ताच्या गुन्ह्यात कुणालाही डावलले नाही. अधिकृत स्वाक्षरी करणारा व्यक्ती व पॉवर ऑफ अटॉर्नी असलेल्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र चौकशीदरम्यान आणखी कुणी दोषी आढळला तर निश्चित त्याच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Web Summary : Chief Minister Fadnavis assures a thorough probe into the land scam involving Parth Pawar's company. Those found guilty will face action, with no one spared. Authorities have already been suspended, and a criminal case has been filed. The investigation aims to uncover the full extent of the irregularities.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने पार्थ पवार की कंपनी से जुड़े भूमि घोटाले की गहन जांच का आश्वासन दिया। दोषियों पर कार्रवाई होगी, किसी को बख्शा नहीं जाएगा। अधिकारियों को निलंबित कर दिया गया है, और आपराधिक मामला दर्ज किया गया है। जांच का उद्देश्य अनियमितताओं की पूरी हद तक पता लगाना है।