नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या आझादहिंद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 21:37 IST2022-03-10T21:35:59+5:302022-03-10T21:37:30+5:30
Nagpur News नागपूर रेल्वेस्थानकावर येत असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेसच्या इंजिनची तीन चाके अचानक रुळावरून घसरली.

नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या आझादहिंद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर येत असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेसच्या इंजिनची तीन चाके अचानक रुळावरून घसरली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आऊटरकडील परिसरात डायमंड क्रॉसिंगजवळ घडली.
आझादहिंद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याचे समजताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. आझादहिंद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याचे समजताच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ रिचा खरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, अभियांत्रिकी शाखेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
आझादहिंद एक्स्प्रेस साधारणपणे दुपारी ४ वाजता नागपूरला येते. परंतु ही गाडी आज दोन तास उशिराने नागपुरात आली. ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येत असताना डायमंड क्रॉसिंगजवळ या गाडीच्या इंजिनची तीन चाके रुळावरून घसरली. त्यानंतर रुळाखाली घसरलेली चाके रुळावर आणण्याचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले. त्यापूर्वी सर्व कोचला इंजिनपासून वेगळे करण्यात आले. दुसऱ्या इंजिनने कोच जोडून प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आणण्यात आले. इंजिनला रुळावर आणण्यासाठी दोन तासाचा विलंब लागला. रात्री ८.२५ वाजता आझादहिंद एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
............