लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारच्या काही यंत्रणांबाबत 'आंधळे दळतात, कुत्रे पिठ खातात' असे म्हटले जाते. अर्थात, ज्यांना गरज आहे, अशा नागिरकांना योजनांचा फायदा मिळत नाही. उलट योजना राबविणाऱ्या सरकारला मात्र त्यापोटी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात धावणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेनबाबत अनेक दिवसांपासून असेच सुरू होते. ते लक्षात आल्याने आता रेल्वे प्रशासनाने चुकीची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२११९/ १२१२० अमरावती–अजनी-अमरावती एक्सप्रेस मध्ये एकूण १६ एलएचबी कोच आहेत. नागपूर अमरावती रेल्वे मार्गावर या गाड्या धावतात. नागपूर नंतर वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर आदी रेल्वे स्थानकावरून या गाडीत चढणाऱ्या, उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. अर्थात या गाडीत प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. अनेकदा प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे हे प्रवासी दाटीवाटीने प्रवास करण्याऐवजी दुसरा पर्याय शोधतात. परिणामी रेल्वेचे रोज मोठे आर्थिक नुकसान होते.
विशेष म्हणजे, या ट्रेनला आणखी चार कोच (२ स्लीपर, १ एसी ३ टियर इकॉनॉमी आणि १ एसी चेयर कार) आहेत. मात्र, या चारही कोचला लॉक असते आणि ते रिकामे ढणढण धावत असतात. एकीकडे गाडीत पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवासी नाईलाजाने त्या गाडीत जाण्याऐवजी दुसरा पर्याय शोधतात. दुसरीकडे चार कोच (रिजर्व) असूनही प्रवाशांना त्या कोचचा कसलाही फायदा होत नाही. ते रिकामे धावत असल्याने रेल्वेचेही रोज मोठे आर्थिक नुकसान होते. डोक्यावर हात मारून घेणारा आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार लक्षात आल्याने आता रेल्वे प्रशासनाने या डब्यांना तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्ट २०२५ पासून ही सुविधा होणार आहे.
उद्यापासून आरक्षणाची सोय३१ जुलै २०२५ पासून या डब्यांचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. एकसाथ चार कोच उपलब्ध झाल्यामुळे नियमित प्रवाशांना गाडीत सहजपणे आरक्षण मिळेल. तसेच गर्दीचा त्रासही कमी होईल. विशेषतः स्लीपर आणि एसीत प्रवास करू ईच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.