पोटच्या पिलाला दात लागला, अन् डोळ्यादेखत गेला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 07:52 PM2022-06-01T19:52:27+5:302022-06-01T19:54:53+5:30

Nagpur News बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नवजात पिलाला जन्म दिल्यानंतर त्याला वाघिणीकडून उचलताना दात लागून पिलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

The cub died due to tooth injury in Gorewada | पोटच्या पिलाला दात लागला, अन् डोळ्यादेखत गेला जीव

पोटच्या पिलाला दात लागला, अन् डोळ्यादेखत गेला जीव

Next
ठळक मुद्देगोरेवाडात प्रसवली ‘ली’ वाघिणी राजकुमारकडून पिल्ले होण्यासाठी २ वर्षांपासून सुरू होते प्रयत्न

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात नवजात पिलाला जन्म दिल्यानंतर त्याला वाघिणीकडून उचलताना दात लागून पिलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या वाघिणीचे नाव ‘ली’ असे असून प्राणिसंग्रहालयातील ‘राजकुमार’ वाघाकडून तिला पिल्लू झाले होते. ३१ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडल्याचे उघडकीस आले.

‘ली’ आणि ‘राजकुमार’ या जोडीला पिल्ले होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. ‘ली’चे वय जास्त म्हणजे ११ वर्षे असल्याने या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी होत्या. तिला दिवस गेल्याचे लक्षात आल्यावर मागील महिनाभरापासून तिला राजकुमारपासून स्वतंत्र ठेवून गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यापूर्वी २०१६ मध्ये तिने स्वत:ची पिल्ले मारली होती, हे लक्षात घेऊन यावेळेस तिने पिल्लांना न स्वीकारल्यास संगोपनासाठी विशेष इनक्युबेटरची व्यवस्था प्राणिसंग्रहालयामध्ये करण्यात आली होती.

घटनेच्या वेळी यावेळी प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यकांसह महाराष्ट्र मत्स्य आणि पशुविज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक प्राणिसंग्रहालयात उपस्थित होते. रात्री उशिरा प्रसवपीडा थांबल्यानंतर तिच्या गर्भात आणखी पिल्ले आहेत का, या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून परीक्षण करण्यात येत आहे.

यावेळी प्राणिसंग्रहालय संचालक एस. एस. भागवत, गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धूत, पशुवैद्यकीय विद्यापीठाचे प्राणिप्रसव विभागाचे तज्ज्ञ डॉ. एम. एस. पाटील, प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. मयूर पावशे आणि डॉ. सुजीत कोलंगठ आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

अशी केली होती व्यवस्था

ली वाघीण नैसर्गिक पद्धतीने प्रसव होण्यासाठी तिच्या रात्रनिवाऱ्यात विशेष बाळंतगुंफा तयार करण्यात केली होती. या गुंफेत तापमान आणि प्रकाश नियंत्रण व्यवस्थेव्यतिरिक्त रबरी मॅट, गवताच्या गाद्या याशिवाय़ कुलरची सोय देण्यात आली होती. वाघिणीच्या नैसर्गिक वर्तवणुकीत बदल न होता, लक्ष देण्यासाठी विशेष सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

यापूर्वी तिने मारली होती स्वत:ची पिल्ले

यापूर्वी ली २०१६ साली साहेबराव नावाच्या वाघापासून एकदा गर्भार राहिली होती. त्यावेळी तिने चार पिल्लांना जन्म दिला होता, मात्र त्यावेळी काही वेळातच तिने सर्व पिल्लांना मारून टाकले होते. आईपासून लहानपणीच विभक्त झालेल्या बहुतेक मांसाहारी प्राण्यांमध्ये अशी लक्षणे पहिल्या बाळंतपणात दिसून येतात, असे मत गोरेवाडातील पशुवैद्यकीय अभ्यासकांनी नोंदविले आहे.

 

...

Web Title: The cub died due to tooth injury in Gorewada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.